लोकसभा 2019 : समाजवादी पार्टीच्या ‘त्या’ खासदाराचा भाजपात प्रवेश

लखनऊ : वृत्तसंस्था – निषाद पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी युती करण्याची घोषणा केली आहे. गोरखपूरचे विद्यमान सपा खासदार प्रवीण निषाद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात भाजपा नेते जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवीण निषाद यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

जेव्हा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यानंतर गोरखपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने प्रवीण निषाद यांना उमेदवारी दिली होती. सपा-बसपा-राजद यांच्या महाआघाडीला निषाद यांच्या भाजपा प्रवेशामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

प्रवीण निषाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर यावर बोलताना निषाद पक्षाचे संस्थापक डॉ. संजय निषाद म्हणाले की, “कोणत्याही अटींशिवाय आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देत आहोत. या युतीचा प्रभाव ईशान्य भारतासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांतही जाणवेल. लोकसभांच्या जागांबाबत आमची कोणतीही मागणी नव्हती. सामाजिकता हा मुख्य मुद्दा आहे. गोरखपूरच्या जागेवर कोणाला उमदेवारी द्यायची, याचा सर्वस्वी निर्णय भाजपचा आहे.” असे ते म्हणाले.

भाजपाला पाठिंबा देण्यापूर्वी निषाद पक्षाने समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही दिवसांनंतर मात्र निषाद पक्षाने आपल्या निर्णयावर फेरविचार केला. त्यानंतर निषाद पक्षाने अखेर भाजपाला पाठिंबा देण्याचे घोषित केले.