कोहलीचं ‘विराट’ रेकॉर्ड तोडल्यानंतर ‘जखमी’ झाला ‘हिटमॅन’ रोहित, एकदिवसीय सामने खेळण्याबाबत ‘शंका’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेच्या अखेरच्या टी -२० सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी पाचव्या टी -२० सामन्यात कर्णधारपद हिटमॅन रोहित शर्माकडे देण्यात आले होते. मालिकेत ४-० अशी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाच्या वतीने माउंट मौंगानुई येथे केएल राहुल आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरूवात केली.

संजू सॅमसन (२) पुन्हा एकदा अपयशी ठरला. यानंतर तिसर्‍या क्रमांकावर पोहोचलेल्या राहुल आणि रोहित शर्मा यांनी ८८ धावांची भागीदारी करून संघाला मजबुती दिली. मात्र, राहुल (४५) अर्धशतकापासून मुकला. दुसरीकडे रोहितने जोरदार फलंदाजी करत ३५ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.

१६.४ षटकामध्ये जेव्हा टीम इंडियाचा स्कोर १३८/२ होता, तेव्हाच रोहित शर्मा बाद झाला. रोहितने ४१ चेंडूत ६० रन केले ज्यात त्याने ३ छक्के आणि ३ चौकार मारले.

१७ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर श्रेयसने रोहितबरोबर एक धाव घेतली. यावेळी रोहित पायाच्या स्नायूंमध्ये ताणतणावाने ग्रस्त होताना दिसला. फिजिओ नितीन पटेल यांना त्याच्या उपचारासाठी मैदानात यावं लागलं. अखेर रोहितने खेळण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर लगेचच रोहितने त्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर ईश सोढीला षटकार लगावला, परंतु त्यानंतरच्या दोन चेंडूंवर तो पळून धाव घेऊ शकला नाही. चौथ्या चेंडूनंतर तो स्वत: मैदानाबाहेर गेला. दरम्यान असे वाटले होते की भारतीय संघ मोठी धावसंख्या उभी करू शकेल, परंतु निर्धारित २० षटकांत केवळ १६३/३ धावा करता आल्या. श्रेयस अय्यर नाबाद ३३ धावा काढून परतला.

रोहित शर्मा आपल्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील २१ वे अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला. रोहितने टी -२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले. रोहितने तब्बल २५ वेळेस ५०+ स्कोअर (२१ अर्धशतके + ४ शतके) चा आकडा गाठला.

टी -२० आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक ५०+
२५ – रोहित शर्मा
२४ – विराट कोहली
१७ – मार्टिन गुप्टिल / पॉल स्टर्लिंग
१६ – डेव्हिड वॉर्नर

न्यूझीलंडविरूद्ध टी -२० मालिकेनंतर ५ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दुखापत झाल्यानंतर रोहित शर्मा फिल्डिंगसाठी आला नव्हता. अशा परिस्थितीत वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याच्या खेळीवर शंका वाढू लागल्या आहेत.