राम मंदिर उभारणीचा ‘बदला’ घेण्याचा प्लान, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय PAK

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीस सुरुवात झाली असताना दुसरीकडे पाकिस्तान मोठा कट आखत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान राम मंदिर उभारणीचा बदला घेण्यासाठी भारतातील हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखत आहे. यासंदर्भात गुप्तचर संस्थांकडून तीन राज्यांना अलर्ट जारी केले आहेत.

RSS आणि BJP नेते निशाण्यावर

गेल्या शुक्रवारी इंटेलिजेंस ब्यूरोने वेगवेगळ्या राज्यांना अलर्ट जारी करताना म्हटले होते की, पाकिस्तान भारतात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँगशी संबंधित असलेल्या आरोपींचा वापर करून हिंदू नेत्यांना मारण्याचा कट आखत आहे. अलर्टनुसार, दाऊद इब्राहीम गँग मधील सदस्यांचा वापर करुन पाकिस्तान हल्ल्याचा कट आखत आहे. पाकिस्तान भाजप, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेत्यांची हत्या करुन राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत आहे.

शार्प शूटरला एटीएसकडून अटक

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गोरधन जडफिया यांच्या हत्येचा कट गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीए) उधळून लावला आहे. एटीएस पथकाने शार्प शूटर इरफान शेख उर्फ कालियाने (वय-24 रा. चेंबूर, मुंबई) याला अटक केली आहे. कुख्यात गुंड छोटा शकील टोळीचा हा शार्प शूटर असल्याचे सांगितले जात आहे. जडफिया हे 2002 मध्ये गृहराज्यमंत्री होते. आरोपीला बुधवारी रात्री उशिरा अहमदाबादच्या रिलीफ रोडवरील हॉटेल व्हिनसच्या रुम नंबर 105 मधून रात्री दीड वाजता छापा मारुन अटक केली.

नेत्यांच्या सुरक्षेत वाढ

गोरधन जडफिया 2002 च्या दंगलीवेळी गृह राज्यमंत्री होते. यापूर्वी गुजरातचे गृह राज्यमंत्री हरेन पांड्या यांचीही मार्च 2003 मध्ये हत्या झाली होती. आता त्याच प्रमाणे, पाकिस्तान राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत असल्याचे मानले जात आहे. यामुळे सरकारने हिंदुत्ववादी नेत्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.