‘कभी कभी लगता है अपुन ही भगवान है’, संजय राऊतांची ‘तोफ’ संसदेत धडाडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेनं राज्यात भाजप सोबत काडीमोड घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला एनडीएच्या बैठकीसाठी बोलावण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेना लोकसभा आणि राज्यसभेत वेगळ्या बाकावर बसल्याचे पहायला मिळाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.

अनेक दिवसांपासून भाजपला धारेवर धरणारे संजय राऊत यांची तोफ आज दिल्लीतही धडाडली.आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं. भाजपा नेते स्वत:ला भगवान समजत आहेत. म्हणूनच, आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. कभी कभी लगता है, अपुनही भगवान है, असा त्यांचा समज झाला आहे. मात्र, देशात मोठ-मोठे बादशहा येऊन गेले, पण लोकशाही कायम आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी हा समज चुकीचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.असे परखड मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केले.

एनडीए कोणच्याही मालकीची नाही अशा शब्दात राऊत यांनी भाजपला धारेवर धरले. त्याचप्रमाणे शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावनार असली तरी आम्ही काँग्रेस प्रणित युपीएमध्ये जाणार नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी शायरीद्वारे एक ट्विट देखील केले आहे.

तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था
उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था

यावेळी संजय राऊत यांनी दिवंगत नेते अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्या निधनाने मोठी हानी झाल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.

 

Visit : Policenama.com