कमलेश तिवारी मर्डरकेस : फरारी आरोपी पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत

लखनऊ : वृत्त संस्था – हिंदु समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडातून दोन मुख्य संशयित हे पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली असून त्यांचे शेवटचे लोकेशन वाघा बॉर्डरपासून २८५ किमी दूर अंबालाच्या जवळ आढळून आले आहे.

कमलेश तिवारी हत्याकांडामध्ये मुख्य आरोपी शेख अशफाक हुसैन आणि पठाण मोईनुद्दीन अहमद ऊर्फ फरीद हे दोघे अजूनही फरारी आहेत. त्यांचा शोध उत्तर प्रदेश पोलिसांबरोबर अन्य राज्यातील पोलीस घेत आहे. रविवारी रात्री उशिरा या दोघांचे लोकेशन दिल्ली अमृतसर मार्गावर मिळाले. उत्तर प्रदेश पोलीस आणि गुजरात पोलिसांचे पथकाने रात्री साडे दहा वाजता चंडीगड रेल्वे स्टेशनच्या परिसरात शोध मोहीम राबविली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोघेही सातत्याने आपला पोशाख बदलत आहेत.

कमलेश तिवारी यांची हत्या केल्यानंतर ते दोघे बरेली, मुरादाबाद, गाजियाबाद मार्गे चंडीगड पोहचले. दोघेही जण काही वेळ आपला मोबाईल सुरु करुन परत बंद करत आहेत. हे दोघेही लालकुआ के हॉटेल खालसा इन या हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री ११ वाजता पोहचले होते. त्यांनी सुरतमधील पत्त्यावर पठाण मोईनुद्दीन अहमद आणि शेख अशफाक हुसैन यांच्या ओळखपत्रावरुन रुम बुक केल्याचे आढळून आले आहे.

हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना बेसमेंटमधील रुम दिली होती. शुक्रवारी दुपारपासून ते शनिवारी सायंकाळपर्यंत हॉटेलमध्ये दिसून आले नाही. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. टीव्ही चॅनेलवरील फुटेज पाहिल्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा उघडला तर त्यात रक्ताने भरलेले दोन कुडते आढळून आले.

त्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाने ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने हॉटेलमध्ये गेले. त्यांना तेथे हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू, दोन बॅग, कपडे,मोबाईल, शेविंग किट आणि चार्जर मिळाला आहे. हॉटेलमधून ते कधी पळाले याची माहिती पोलीस घेत आहे.

Visit  :Policenama.com