पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकावर गंभीर आरोप ; सेनेकडून कर्जत बंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वसामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची पिळवणुक करून त्यांच्याकडून पैसे उकळणे, अवैध धंद्यांवर कारवाई न करणे यासह अनेक गंभीर आरोप शिवसेनेकडून कर्जतचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्यावर करण्यात आले असुन सेनेकडून पोलिस अधीक्षकांना त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, आज (गुरूवार) शिवसेनेकडून कर्जत बंदची घोषणा देण्यात आली आहे.

कर्जत शहरातील सर्व व्यवहार आज सकाळपासूनच बंद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. परिक्षा सुरू असल्याने शाळा-महाविद्यालये सुरू आहेत मात्र मुख्य बाजारपेठ आणि दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू आहे. कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असुन त्यामध्ये कर्जतचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची पिळवणुक करून त्यांच्याकडून पैसे उकळणे आणि अवैध धंद्यांना आश्रय देणे अशा गंभीर आरोपींचा त्यामध्ये समावेश आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी निलेश यादव नावाच्या तरूणाला बेदम मारहाण केल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निलेश यादवच्या डोक्याला पोलिसांनी रिव्हॉल्व्हर लावल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

तालुक्यातील बहिरोबावाडी येथे राहणारे निलेश यादव यांना काल (बुधवारी) कर्जत पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यावेळी मनोज जाधव नावाच्या व्यक्‍तीने त्यांना माझ्या चुलत भावाच्या विरोधात गुन्हा दाखल का केला असे म्हणुन मारहाण केली आणि त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी मारहाण केली असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून करण्यात आलेल्या गंभीर आरोपाची दखल पोलिस अधीक्षक कार्यालय तात्काळ घेईल का आणि पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकावर कारवाई होईल काय याकडे संपुर्ण कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

You might also like