बारामतीत कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपची ही दिग्गज ‘स्टारकास्ट’

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती मतदारसंघाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केलेली आहे. पवार कुटुंबियांचा
बाल्लेकिल्ला असलेला बारामतीला सुरुंग लावण्यासाठी ह्या वेळेस भाजप पूर्ण ताकतीने मैदानात उतरला आहे. बारामतीत कांचन कुल यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावरील अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती ईराणी व योगी आदित्यनाथ तर दुसरीकडे राज्यस्तरावरील पंकजा मुंडे, राम शिंदे, गिरीश महाजन, पाशा पटेल, चंद्रकांत पाटील ही दिग्गज ‘स्टारकास्ट’ भाजप मैदानात उतरवणार आहे.

बारामती हा पवार कुटुंबियांचा पारंपरिक मतदार संघ आहे. बारामतीतून राष्ट्रवादी-काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिय सुळे रिंगणात आहेत. २०१४ साली मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात भाजपने रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.

कोणत्याही परिस्थितीत बारामतीची जागा खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. त्यासाठी भाजपने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा बारामतीत आयोजित केलेल्या आहेत.

प्रचार सभा
बारामतीच्या शारदा प्रांगणात १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सभा घेणार आहेत. त्याच दिवशी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा खडकवासला येथे होणार आहे. तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २१ एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा बारामती शहर किंवा सासवडमध्ये होणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची २१ एप्रिल रोजी हिंजवडी परिसरात होणार आहे. दुसरीकडे राज्यस्तरीय नेत्यांपैकी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाशा पटेल, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत.

You might also like