मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बालीश’ : शरद पवार

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला एक दिवस राहीला आहे. देशातील प्रचार शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांवर परखड मत व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालीश असल्याचे म्हटले. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालीश आहेत. त्यांच्या बालसुलभ वागण्याकडे मी दुर्लक्ष करतो. लहान मुलांच्या बोलण्याकडे फारस गांभीर्याने बघायचे नसते अशी टीका त्यांनी यावेळी केली. फडणवीस यांचे वडील हे माझ्यासोबत विधीमंडळात होते. त्यांच्यासोबत मी कामही केले आहे. आता ही मुल राजकारण करत आहेत. मुलांच्या वागण्या बोलण्याकडे फारस लक्ष द्यायचे नसते, असे ही शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या सभेत शरद पवारांना टार्गेट करत आहेत. त्यावर बोलताना पवार म्हणाले, मोदींना पवार कुटुंबाशीवाय दुसरे काहीच दिसत नाही. त्यांना सर्वच ठिकाणी पवार कुटुंब दिसतं. एकत्र कुटुंबाची ताकद काय असते याची जाणीव आम्हाला आहे. मोदी हे कायम एकटे राहत असल्याने त्यांना कुटुंबाचे ममत्व माहित नाही असा टोला त्यांनी लगावला. मोदी माझ्याविषयी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीका देखील त्यांनी केली.

विरोधीपक्ष आता जरी वेगवेगळे लढत असले तरी निवडणुकीनंतर ते एकत्र येतील त्याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. भाजपला बहुमत मिळणार नाही असंही ते म्हणाले. विजयसिंह सुद्धा रणजितसिंहांच्या मार्गानं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.