विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी परिवर्तनाची गरज : पवार

उस्मानाबाद येथील जाहीर सभेत शरद पवार यांचे आवाहन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –  बेरोजगारी, दुष्काळ, पाणीटंचाई, पशुधनावर ओढावलेले संकट, असे अनेक महत्वाचे प्रश्न टाळून सत्ताधारी नको त्या विषयावर गप्पा मारत आहेत. शेतमालाला योग्य भाव, कमी व्याजाने कर्ज आणि दुष्काळात शेतकर्‍यांच्या खांद्यावर मदतीचा हात देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याकरिता विनाअट सरसकट कर्जमाफी हा एकमेव पर्याय आपल्यासमोर उरला आहे. त्यासाठी यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन गरजेचे असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री आमदार मधुकर चव्हाण, माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह शेकापचे भाई धनंजय पाटील आदींसह महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सत्ता केवळ मिरविण्यासाठी नसते. सत्तेतून मिळालेले अधिकार लोकांसाठी वापरायचे असतात. दुर्दैवाने राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधार्‍यांना याची जाणीव राहिली नाही. शेती आणि शेतकर्‍यांविषयी यांना अजिबात आस्था नाही. आपण खाणार्‍यांचा नव्हे तर पिकविणार्‍यांचा विचार करतो. पिकविणाराच जगला नाही, तर खाणारांसाठी विदेशातून अन्न आणावे लागेल. त्यासाठी कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकर्‍यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देवून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यायला हवा, असेही पवार यांनी सांगितले.
पंढरपूर येथील जाहीर सभेत शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी युती गयी भाड मेें, असे ओरडून सांगणार्‍या उध्दव ठाकरे यांनी कोणत्या फायद्यासाठी भाजपासोबत गळाभेट घेतली आहे ? असा सवाल उपस्थित करीत आजचे सरकार बदलून तरूणांचे नवे सरकार अस्तित्वात आणण्यासाठी बहुमताने महाआघाडीला समर्थन द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

पवारांच्या घरात मतभेद आहेत. त्यांचा पुतण्या ऐकत नाही, अशी चर्चा नरेंद्र मोदी करीत आहेत. दिल्लीत गेल्यानंतर त्यांची भेट घेवून आपल्या घरातील मतभेद त्यांना कसे कळाले ? याबाबत विचारणा करणार आहे. यांना कुटूंबाचा, घराचा अनुभव नसताना दुसर्‍याच्या घरात लक्ष घालीत आहेत. आमच्याकडे सांगण्यासारखे आणि बोलण्यासारखे खूप आहे. गावरान भाषेत आम्ही बोलायला सुरूवात केली तर पळता भुई थोडी होईल, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांची पवारांनी खिल्ली उडवली.

350 कोटी रूपयांचे राफेल विमान एक हजार 750 कोटीला खरेदी करून नरेंद्र मोदी कोणती देशसेवा करीत आहेत ? उठसूट पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाने गळे काढणार्‍या नरेंद्र मोदींनी भारताचा खरा इतिहास जाणून घ्यावा. घरातील दोन हत्त्या झालेल्या असताना पुढच्या पिढीने देशसेवा करण्याचे काम सोडले नाही. हा त्याग समजून घेण्यासाठी संवेदनशील काळीज असावे लागते. देशासाठी बलिदान देणारांचे या सरकारला अजिबात आस्था नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ असल्याचे पवार यांनी सांगितले. कार्यक्रमास मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाची पवारांनी घेतली भेट
शिवसेना उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेल्या दिलीप ढवळे या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटूंबाची शरद पवार यांनी तडवळा येथे जावून भेट घेतली. ढवळे यांच्या मुलाला आपल्या संस्थेत नोकरी देण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. तसेच राज्य सरकारने तत्काळ मोठ्या स्वरूपात आर्थिक मदत देवून या कुटूंबाला दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली. अद्याप गुन्हा नोंद न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून ताबडतोब गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली. तसेच गुन्हा नोंद न झाल्यास तो कसा नोंद करवून घ्यावयाचा हे देखील आपल्याला चांगले कळते, अशा शब्दात सूचक इशाराही दिला.

You might also like