नवलच ! भाजपचा प्रचार केला म्हणून ‘कुत्र्याला’ घेतलं ताब्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत आश्चर्यकारक गोष्टी समोर येत आहेत. नंदुरबारमध्ये पोलिसांनी एक आश्चर्यकारक कारवाई केली आहे. ही कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे. भाजपचे स्टिकर्स असलेल्या एका कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्या अंगावर मोदी लाओ देश बचाओ असा भाजपचा प्रचार करणारे स्टीकर्स चिकटवलेली होती. त्यामुळे पोलिसांनी भाजपचा प्रचार केल्याप्रकरणी कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला ताब्यात घेतलं.

काल चौथ्या टप्प्य़ातील मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान सुरु असताना कुत्र्याच्या माध्यमातून भाजपचा प्रचार सुरु असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. नंदूरबारमध्ये नवनाथनगर परिसरात एकनाथ मोतीराम चौधरी नावाची ६५ वर्षीय व्यक्ती कुत्र्यासोबत फिरत होती. या कुत्र्याच्या अंगावर चक्क कमळ हे भाजपचं चिन्ह असलेलं स्टीकर चिकटवण्यात आलं होतं. तर या स्टीकरवर मोदी लाओ देश बचाओ असं घोषवाक्य होतं.

या प्रकऱणी आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शहरात कुत्र्यासह फिरत असलेल्या चौधरी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर मतदान सुरु असताना भाजपचा प्रचार केल्याप्रकऱणी भादंवि १७१(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कुत्र्याला पोलिसांनी महापालिकेला ताब्यात घेण्यास सांगितलं आहे.