शिक्रापुर : नवनिर्वाचित सभापती कडून लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना शासनाने विविध नियम लादलेले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिलेले आहे, मात्र शिरुर तालुक्यात सध्या या नियमांचा फज्जा उडाला असल्याचे दिसत असून प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे मागील आठवड्यात एका लग्न समारंभांसाठी डीजे लावत अनेक नागरिक एकत्र आहे तसेच त्याठिकाणी नवरदेवा सह मिञमंडळी नाचत होते. नवरदेवाची वरात काढली मात्र तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हते तसेच त्यांनी सार्वजनिक अंतर पाळले नव्हते त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणच्या नवरदेवासह सहभागी युवकांवर गुन्हे दाखल केले, तसेच काल कोरेगाव भीमा येथे तीस हून अधिक युवकांनी एकत्र येत वाढदिवस साजरा केला त्या ठिकाणी देखील त्यांनी कोणत्याही नियमांचे पालन केले नाही, तेथे वाढदिवस करणाऱ्या युवकांच्या तोंडावर मास्क नव्हते तसेच सार्वजनिक अंतर पाळलेले नव्हते त्यामुळे शिक्रापूर पोलीस प्रशासनाने एका सीसीटीव्ही च्या आधारे वाढदिवस साजरा करणाऱ्या बत्तीस हून अधिक युवकांवर गुन्हे दाखल केले.

एकीकडे लग्न करत असताना नवरदेवावर गुन्हे दाखल होत असतानाच शिरूर तालुक्यातील एका मोठ्या पदासाठी निवडणूक झाली आणि त्यांनतर सदर पद भेटल्या गावामध्ये पदाधिकाऱ्याची मिरवणूक काढण्यात आली, यावेळी गावातील युवकांनी गुलालाची उधळण करून, डान्स करत मिरवणूक काढली परंतु यावेळी कोणत्याही युवकांनी तोंडावर मास्क घातलेले नव्हते, सार्वजनिक अंतर पाळलेले नव्हते, सदर मिरवणूक पार पडत असतानाच सोशल मिडीयावर प्रसारित झाले, मात्र त्यानंतर देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही आणि मिरवणूक करणाऱ्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

याबाबतीत गावातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने आमच्याशी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की आमच्या करंदी गावामध्ये तालुक्याचे मोठे पद आले याचा आम्हाला आनंद आहे, मात्र सध्या कोरोना वाढत असताना सर्व स्तरातून त्याला रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात असताना नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे हे चुकीचे आहे यामुळे शिरूर तालुक्यातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिरूर व शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे, मात्र करंदी येथे घडलेल्या घटनेवर पोलीस काय भूमिका घेणार कि राजकीय दबावाला बळी पडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.