काय सांगता ! होय, ICU ची चावी सापडेपर्यंत रूग्णाचा गेला जीव

मध्य प्रदेश :  वृत्तसंस्था –   देशात एकीकडे कोरोनाने मृत्यूची संख्या वाढत आहे, तर इतर कारणामुळे देखील लोकांचा जीव जात आहे. मध्य प्रदेशच्या उजैन शहरात एक धक्कादायक घटना घडली असून सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात पाठवलेल्या एका रुग्णाचा आयसीयूची चावी सापडत नाही तोच त्याचा जीव गेला.

येथील ५५ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री उजैनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. तिची परिस्थिती आणखी बिघडत असल्याचे पाहून तिला कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच तिचा कोरोना चाचणीसाठी देखील नमुना घेतला गेला.

पण नंतर परिस्थिती आणखीच खराब होत असल्याने तिला एका खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाल्याने ऍम्बुलन्सची सोय केली गेली. तिला घेऊन ऍम्ब्युलन्स रुग्णालयात पोचली. नंतर तिला स्ट्रेचरवरून आत नेले गेले. आत गेल्यावर आयसीयूचे कर्मचारी रुग्णालयात नव्हते. त्यामुळे कुलूप तोडले गेले. दरम्यान त्या महिलेची परिस्थिती अजूनच खराब झाली. थोड्याच वेळात कर्मचाऱ्यांनी कुलूप तोडले. पण नंतर उपचार करूनही महिला वाचू शकली नाही.