…तो पर्यंत भाजपचे ‘ऑपरेशन कमळ’ राज्यात अशक्यच

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  जोपर्यंत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत भाजपचे ‘ऑपरेशन कमळ’ राज्यात शक्यच (BJP’s ‘Operation Kamal’ is not possible in the state ) नाही अन् एखादा आमदार फुटलाच तर त्याचे डिपॉजिट जप्त होईल. त्यामुळे महाविकास आघाडीचे हे सरकार पंधरा नव्हे पंचवीस वर्षे टिकेल, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (By Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी भाजपला लगावला आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. यावेळी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम ठेवण्यासाठी शिवसेना सोबत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही कायम सोबत ठेवा, असा टोला मारला. त्यानंतर मुश्रीफांनी हाच धागा पकडत टोलेबाजी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता पदवीधरांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन देत आहेत. बारा वर्षे ते पदवीधरांचे प्रतिनिधी होते. राज्यात दोन नंबरचे मंत्री होते, तेव्हा त्यांना कुणी अडवले होते का ? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.

सहा वर्षांत पदवीधरांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढले आहेत. ज्यांनी प्रश्न वाढवले, ते मैदान सोडून पळून गेले आहेत. पुण्यातही त्यांनी काही कामे केली नाहीत. चंद्रकांत पाटील जिथे जातात, तिथे विरोधी पक्षाचा फायदा होतो. या निवडणुकीत तो होणारच असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील ( Water Resources Minister Jayant Patil) म्हणाले.

यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, अरुण दुधवडकर, आसगावकर, लाड यांची भाषणे झाली. आर. के. पोवार यांनी आभार मानले.