‘या’ कारणामुळे शिवसेना आमदारांनी जयपूरला जाण्यास दिला नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तास्थानापनेवरून सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून शिवसेनेच्या आमदारांना जयपूरला पाठविण्यात येणार होते. त्यासाठी विमानाची तिकिटेही काढण्यात आली होती. मात्र आमदारांनीच विरोध केल्याने त्यांची व्यवस्था मुंबईतीलच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

शिवसेना आमदारांची बैठक दुपारी 12 वाजता मातोश्रीवर होती. बैठकीनंतर तुम्हाला जयपूरला जायचे आहे, बोर्डिंग पासही तयार आहेत असा आदेश त्यांना देण्यात आला होता. मात्र आमच्यापैकी सर्वच आमदार निष्ठावान आहेत. आम्ही उद्धवजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी जयपूरला जाऊन राहणे योग्य दिसणार नाही. शिवाय मतदारसंघात काही परिस्थिती अचानक उद्भवली तर जयपूरहून तेथे लगेच पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे एकत्रितच ठेवायचे असेल तर आम्हाला मुंबईत राहू द्या अशी भूमिका आमदारांनी घेतली. त्यामुळे आमदारांना जयपूरला पाठवणे शिवसेनेने ऐनवेळी रद्द केले व त्यांची व्यवस्था मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली.

राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. तोपर्यंत राज्याच्या राजकारणात कोणतीही उलथापालथ घडू शकते. आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच पक्षांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

Visit : Policenama.com