अजितदादांनी तातडीनं मान्य केली राजू शेट्टींची ‘ही’ मागणी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस नवीन रुग्णसंख्या समोर येत आहे. या 2 जिल्ह्यात राज्य सरकारनं तातडीनं लक्ष घालून व्हेंटीलेटरची सुविधा पुरवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. येत्या 4 दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात व्हेंटीलेटरसहित अतिदक्षता विभागासाठी बेड पुरवू असं आश्वासन अजित पवार यांनी शेट्टींना दिलं आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी ?

राजू शेट्टी यांनी सांगितलं की, “सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. व्हेंटीलेटरचा अभाव असल्यानं तरुण दगावत आहेत. त्यातच या दोन्ही जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. मुंबईत आता कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. तेथील व्हेंटीलेटर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात यावेत. खासगी रुग्णालयातही बेड अपुरे आहेत. ऑक्सिजनची पातळी जर खालावली तर रुग्णांना तातडीनं बेड मिळत नाहीत. त्यामुळं व्हेंटीलेटर अभावी रुग्ण दगावत आहेत. यामुळं सांगलीतील मृत्यू दर सर्वाधिक झाला आहे. ही स्थिती नियंत्रणात यावी म्हणून गेले दोन दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधतो आहे” असंही ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यात 300 व सांगली जिल्ह्यात 150 बेडचा प्रस्ताव गेला आहे. त्यास राज्य सरकारनं तातडीनं मान्यता द्यावी अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वेगानं पसरणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. ग्रामीण भागात तसंच इचलकरंजी शहरात देखील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही जिल्ह्यात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीनं दोन्ही जिल्ह्यातील कॉविड सेंटरना बुधवारी मान्यता देऊन येत्या 4 दिवसात व्हेंटीलेटरसह आयसीयु बेडची सुविधा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.