जिल्ह्यातील आठ विद्यमान आमदार पिछाडीवर, अनेक प्रस्थापितांना धक्का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून नगर जिल्ह्यातील बारा पैकी तब्बल आठ विद्यमान आमदार मतमोजणीत पिछाडीवर आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप वगळता एकही विद्यमान आमदार आघाडीवर नाही. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांच्यासह अनेक प्रस्थापितांना धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपात गेलेल्या आ. वैभव पिचड यांना राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहानटे यांनी पिछाडीवर टाकले आहे. संगमनेर व शिर्डी मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे थोरात व विखे हे आघाडीवर आहेत. कोपरगाव मतदारसंघात थोड्या मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आघाडीवर असून, भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे या पिछाडीवर आहेत. श्रीरामपूर मतदारसंघातून शिवसेनेचे आ. भाऊसाहेब कांबळे पिछाडीवर असून काँग्रेसचे लहू कानडे हे आघाडीवर आहेत. राहुरी मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले हे पिछाडीवर, तर राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे हे आघाडीवर आहेत.

शेवगाव-पाथर्डी मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे आघाडीवर, तर भाजप आमदार मोनिका राजळे या पिछाडीवर आहेत. नेवासा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे हे पिछाडीवर, तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकराव गडाख हे आघाडीवर आहेत. नगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे सुमारे तीन हजार मतांनी आघाडीवर, तर शिवसेना उपनेते अनिल राठोड हे पिछाडीवर आहेत.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री राम शिंदे हे पिछाडीवर, तर राष्ट्रवादीचे रोहित पवार हे सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून सुमारे अडीच हजार मतांच्या फरकाने माजी मंत्री बबनराव पाचपुते हे आघाडीवर आहेत. तेथे राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार पिछाडीवर आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी हे मोठ्या मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. तेथे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालाची परिस्थिती पाहता नगर जिल्ह्यात अनेक प्रस्थापितांना धक्का बसू शकतो. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.

Visit : Policenama.com