…तर महाराष्ट्रात पर्यायी सरकार, राष्ट्रवादीचा शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या प्रस्ताव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले असताना देखील सत्ता स्थापनेबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. लोकांनी युतीला स्पष्ट बहुमत दिले असताना शिवसेना-भाजपमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चा होत नाही. दुसरीकडे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशा समीकरणांची जुळवाजुळव सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेची तयारी असल्यास राज्याला पर्यायी सरकार मिळेल, असे म्हणत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष
प्रस्ताव दिला आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपला सर्वाधीक जागा मिळाल्याने भाजप मोठा पक्ष ठरला आहे. असे असले तरी संख्याबळ नसल्याने त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. यावर भाष्य करताना तशी वेळ येणार नसल्याचे मलिक यांनी सांगितले. शिवसेनेची तयारी असल्यास आणि त्यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितल्यास आम्ही हात पुढे करू. त्यामुळे राज्याला पर्य़ायी सरकार मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

 

राज्यात 1995च्या फार्म्युल्याप्रमाणे सत्ता स्थापन करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करु शकते. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. त्या बदल्यामध्ये काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाईल, असेही या नेत्याने सांगितले. शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडल्यावरच या प्रकारे सत्ता स्थापन होईल, असे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com