‘कोरोना’च्या संकटात इंजिनीअरची गेली नोकरी, सुरू केलं चक्क इडली सेंटर

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊन च्या काळात अनेक लोक बेरोजगार झाले. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. पण अशा परिस्थितीमध्ये चंद्रपूरमधील पलाश जैन नावाचा तरुण इंजिनिअर इतरांसाठी आदर्श ठरत आहे. तुकूम परिसरात राहणारा पलाश जैन याने नाशिक विद्यापीठामधून मॅकेनिकल इंजिनीअरींगची पदवी प्राप्त केली. मग तो औरंगाबाद मधील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कामला लागला. त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी ३० ते ४० इंजिनीअर होते. सर्व काही व्यवस्थित सुरु होते. परंतु, त्याचा हा उत्साह केवळ आठ महिनेच राहिला.

जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना संसर्गाचा देशात शिरकाव झाला. त्यामुळे लॉकडाऊन पूर्वीच कंपनीतील ३०० जणांना काढण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. यामध्ये पलाशची होता. मात्र, पलाशने आधीच राजीनामा देत आपलं घर गाठले. लॉकडाऊनच्या काळामध्ये तब्बल दोन महिने तो घरीच बसून होता. तर काही दिवस तो नैराश्यात गेलेला. पण लवकरच त्याने स्वतःला सावरले. कोरोना संसर्गामुळे अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांनी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांना बघून त्यालाही नवी दिशा मिळावी. दिवसभर हे विक्रेते येथे राबत असत पण त्यांना खाण्याची कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. ही संधी पलाशने हेरली आणि त्याने घरी इडली पार्सल विकणे सुरु केले. ते देखील फक्त २० रुपयांत पाच.

पलाशला सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये प्रतीसाद न मिळाल्यामुळे तयार केलेल्या इडल्या कुटुंबीयांनाच खाव्या लागल्या. मात्र त्याने हार मानली नाही. पहाटे तीन वाजता उठून इडली तयार करायची आणि सकाळी सहा वाजता भावासोबत ग्राहकांच्या शोधात फिरायचं. हीच त्याच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. त्याला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. आता तो रुग्णालय, छोटे व्यवसायिकांना इडली विकत आहे. कुटुंबाला काही हातभार लागावा, यासाठी त्याने हा व्यवसाय सुरु केला. यामध्ये तो ‘खुश’ नाही पण ‘समाधानी’ आहे.

कोरोना संसर्गाने आपल्याला जगण्याचा नवा दृष्टीकोन दिला आहे. नोकरी गमावलेल्या अभियंता पलाशची ही सुरुवात छोटी वाटत असली तरी भावी उद्योजगांची बीजे याच कृतीत दडली असतात असे दाखले आपापल्या इतिहासात अनेक आहेत. त्यामुळे पलाशची ही भरारी नैराश्याने ग्रासलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.