पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व अखिल सूसगाव व्यापारीसंघटनेच्या वतीने आयोजित व्यापारी मेळावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  व्यापाऱ्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. उपनगरांमध्ये व्यापाऱ्यांची संख्या वाढत असून शहरांजवळील गावांमध्येही व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटना एकत्र येऊन व्यापाऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चांगले काम करु शकतात आणि त्यातून व्यापाराला चालना मिळून संबंधीत परिसराचा विकास होण्याचे काम होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केले.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व अखिल सूसगाव व्यापारी संघटनेच्या वतीने व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवंगुणे बोलत होते. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, सूस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शरद भोते, कार्याध्यक्ष भरत चौधरी, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, उपसरपंच अनिकेत चांदेरे, रिटेल व्यापारी संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सोमाराम राठोड, सचिव नवनाथ सोमसे, उपाध्यक्ष सुनील गेहलोत, सूस व्यापारी संघटनेचे सचिव तुषार पोतले, उद्योजक सुनील चांदेरे, नारायण चांदेरे, अजित चंगेडिया, कैलास डांगी आदी मान्यवर आणि व्यापारी उपस्थित होते.

सूसमध्ये व्यापाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. नागरिकरण होत असल्याने संबंधीत व्यापाराच्या दृष्टीने व्यापारी येतात. यामुळे गावचा व परिसराचा विकासच होत असतो. व्यापारी सेवा देत असतात त्यामुळे त्यांना होणारा त्रास हा विकासाला खिळ घालणारा आहे. त्यामुळे सूस ग्रामपंचायत ही व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पुढाकार घेईल, असे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे व उपसरपंच अनिकेत चांदेरे यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या संरक्षणाबरोबरच घडलेल्या घटनेच्या तपासासाठीही कॅमेरा महत्त्वाचा ठरत आहे. याबरोबरच व्यापाऱ्यांनी होणाऱ्या त्रासाबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली पाहिजे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/