राजू शेट्टी फडणवीस यांच्या गोटात होते, तेव्हा ते सरकारी नव्हते ?, शिवसेनेची टीका

पोलिसनामा ऑनलाईन – भाजपाकडून सुरु असलेल्या दूध आंदोलनावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे. दूध भुकटीची आयात थांबवा ही शेतकर्‍यांची पहिली मागणी आहे . ती केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी त्यावर का बोलत नाहीत ? असा सवाल विचारण्यात आला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी सरकारी आंदोलक आहेत, असा टोला मारणारे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भूतकाळाची आठवण करुन दिली आहे.

कालपर्यंत हेच शेट्टी फडणवीस यांच्या गोटात होते. तेव्हा ते सरकारी नव्हते काय? राजू शेट्टी यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन केले होते. तेव्हा याच शेट्टींना फडणवीस खांद्यावर घेऊन मिरवत होते. आज शेट्टी यांची जागा सदाभाऊ खोतांनी घेतली असे अग्रलेखात म्हटले आहे. गाईच्या दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे व दूध भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये निर्यात अनुदान द्यावे असे सदाभाऊ खोतांचे म्हणणे आहे. खोत वगैरे मंडळी सहा महिन्यांपूर्वी सरकारमध्ये होती व तेव्हा त्यांनी याबाबत काहीच पावले उचलली नाहीत. आज ते रस्त्यावर उतरले आहेत, दुधाचे टँकर फोडत आहेत, दुधाची नासाडी करीत आहेत. दूध भुकटीची आयात थांबवा ही शेतकर्यांची पहिली मागणी आहे व ती केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे . महाराष्ट्रातील भाजप पुढारी त्यावर का बोलत नाहीत ? दूध भुकटीचा विषय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही , तो इतरही राज्यांत तितकाच महत्त्वाचा आहे , पण भाजपशासित राज्यांत दूध उत्पादक शेतकर्यांचे प्रश्न वार्‍यावर सोडले आहे. शेतकर्‍यांना दूध भाव मिळावा , पण त्यासाठी केंदाने तत्काळ महाराष्ट्राला निधी द्यावा . दूध भुकटी आयातीचा निर्णय रोखावा . महाराष्ट्र , गुजरातसारख्या राज्यांच्या ताकदीवरच केंद्राचे दुकान चालले आहे . त्यामुळे पेटलेल्या दुधाचा भडका थांबवा व दुधात पेट्रोल ओतणार्‍या विरोधी नेत्यांना आवरा, अशी टीका करण्यात आली आहे.