चेन्नईयीन एफसी गुणवान फुटबॉलपटूंची खाण

पोलीसनामा ऑनलाइन – हिरो इंडियन सुपर लिगचा मागील मोसम चेन्नईयीन एफसीकरीता निराशाजनक ठरला. ते गतविजेते होते, पण त्यांच्यावर दैव इतके रुसले की जॉन ग्रेगरी यांच्यासारखा मार्गदर्शक सुद्धा निरुत्तर ठरला. ते काहीच करू शकले नाहीत. हा क्लब दहा संघांमध्ये अखेरच्या स्थानावर फेकला गेला. दोन वेळा विजेतेपद जिंकलेल्या क्लबची इतकी अधोगती होईल यावर सहजी विश्वास बसणे कठिण ठरले. आता सहाव्या मोसमाला लवकरच प्रारंभ होत आहे. अशावेळी माजी विजेत्यांना सर्वोत्तम फॉर्म गवसण्याची आशा असेल.

आयएसएलमधील चेन्नईयीनच्या वाटचालीत चढ-उतार आले आहेत. अर्थात दोन वेळच्या विजेत्यांसाठी मैदानावरील निकाल हीच सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट राहिलेली नाही. अभिषेक बच्चन, महेंद्रसिंह धोनी आणि व्हिटा दानी यांच्याकडे संयुक्त मालकी असलेल्या चेन्नईयीन एफसीने तरुण खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आहे. 2014 मध्ये आयएसएल सुरु झाल्यापासून तरुण खेळाडूंच्या प्रगतीवर दिलेला भर कुणापेक्षाही कमी नाही.

दोन मोसम झाल्यानंतर या क्लबने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अ‍ॅकॅडमीतील पाच खेळाडूंना करारबद्ध केले. त्यानंतर या खेळाडूंना एफसी मेट्ज अ‍ॅकॅडमीत ट्रेनींगसाठी पाठविले. त्यांच्या दौऱ्याचा पूर्ण खर्च करण्यात आला. तीन वर्षांच्या कालावधीत या पाच खेळाडूंनी मारलेली मजल लक्षवेधी ठरली असून त्यांच्यावर केलेल्या गुंतवणूकीचे फळ मिळाले आहे.

हे पाच प्रतिभाशाली खेळाडू म्हणजे अनिरुध थापा, जेरी लालरीनझुला, बोरींगदाओ बोदो, बेदाश्वोर सिंग आणि प्रोसेनजीत चक्रवर्ती. हे सर्व जण आता नियमित व्यावसायिक खेळाडू बनले आहेत. यातील थापा आणि लालरीनझुला हे दोघे चेन्नईयीन एफसीच्या प्रमुख संघाकडून खेळतात.

थापा गेल्या दोन मोसमांत मिळून 34 सामन्यांत सहभागी झाला आहे. यात 17 वेळा तो स्टार्टींग लाईन-अपमध्ये होता. दोन गोल आणि तीन गोलांमध्ये साथ (अ‍ॅसिस्ट) अशी कामगिरी त्याने केली आहे. दुसरीकडे लालरीनझुलाने परदेशात ट्रेनिंग घेऊन परतल्यापासून आयएसएलमध्ये 3658 मिनिटे मैदानावर खेळ केला आहे. त्याने लेफ्ट-बॅक म्हणजे स्वतःचे स्थान असा लौकीक निर्माण केला आहे. एक गोल आणि चार अॅसिस्ट अशी कामगिरी त्याने नोंदविली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चेन्नईयीनने आपली विकास प्रक्रिया सुरु ठेवली आणि एआयएफएफ अॅकॅडमीच्या आणखी तीन तरुण खेळाडूंना करारबद्ध केले. यात रहीम अली, अभिजीत सरकार आणि दिपक तांग्री यांचा समावेश आहे. हे तिघे 20 वर्षांखालील गटाचे आहेत.

व्हीटा दानी यांनी सांगितले की, देशाच्या सर्व राष्ट्रीय संघांमध्ये मिळून आमचे तब्बल 13 खेळाडू आहेत आणि आम्हाला याचा अभिमान वाटतो. अभिजीत, रहीम आणि दिपक यांना करारबद्ध करीत आम्ही तरुण खेळाडूंच्या विकासाकरीता आमची निष्ठा अधोरेखित केली आहे.

करारबद्ध झालेल्या या तरुण खेळाडूंमध्ये थापाने क्लब तसेच देशासाठी केलेली प्रगती एक अविष्कार ठरली आहे. या प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने देशातील सर्वोत्तम प्रतिभासंपन्न तरुण खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. लालरीनझुलाने 2018 मधील विजेतेपदात लेफ्ट-बॅक म्हणून बहुमोल योगदान दिले. भारताला सरस फुल-बॅक म्हणून तो पर्याय निर्माण करू शकतो.

इतर खेळाडूंनीही आपले स्थान निर्माण केले आहे. प्रोसेनजीत मिनर्व्हा पंजाबमध्ये, बेदाश्वोर टीआरएयू एफसीकडे आहे. बोडोने मिनर्व्हा, गोकुलम केरला आणि केरला ब्लास्टर्स अशा संघांमध्ये स्थान मिळविले आहे. हे सारे चेन्नईयीनच्या योजनाबद्ध प्रयत्नांमुळे शक्य झाले. तरुण खेळाडूंच्या क्षमतेवरील विश्वासामुळे हा क्लब आगळावेगळा ठरतो.

Visit : Policenama.com