मनसेच्या शहराध्यक्षांची राजकीय अपरिपक्वता !

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन (मल्हार जयकर) – मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांचा पराभव करा अशी पक्षाची भूमिका पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर केली असताना पुण्यातील मनसेच्या शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रक काढून भाजपला म्हणजेच मोदी-शहा यांना पूरक अशी भूमिका घेतलीय. त्यांची ही पत्रकबाजी म्हणजे राजकीयदृष्ट्या अपरिपक्वताच म्हटली पाहिजे. असं मत मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने पोलिसनामाशी बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, पक्षसंघटनेकडे नेहमीच दुर्लक्ष करणारे मनसेचे शहरप्रमुख कधी नव्हे ते वृत्तपत्रात झळकले. त्यांनी मनसेची लोकसभेतील भूमिका पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आधी जाहीर करून टाकली. वास्तविक मनसेची लोकसभा निवडणुकीत भूमिका काय असेल याची थोडी कल्पना राजसाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात दिली होती, ती ‘मोदी आणि शहा’ यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी राज्यातल्या त्या त्या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवाराच्या पाठीशी मनसैनिकांनी उभं राहायचं, असं सांगितलं होतं. मात्र पुण्यात मोदी-शहांचा उमेदवार असलेल्या गिरीश बापट यांच्या विरोधात सध्यातरी काँग्रेसचा उमेदवारच तुल्यबळ असणार आहे, हे स्पष्ट आहे. मग प्रवीण गायकवाड असो नाहीतर अरविंद शिंदे असो. त्यांनाच पाठींबा मनसैनिकांना द्यावा लागणार आहे. अशावेळी मनसैनिकांनी काय करायचं हे शहराध्यक्ष शिंदे यांनी सांगायला हवं होतं. पण त्यांनी तसं न करता काँग्रेसजनांना बोधामृत पाजलंय! काँग्रेसनं मनसेचे नाव घेऊ नये, असं त्यांना बजावलं. त्यामुळं मनसैनिकांच्या मनाचा गोंधळ उडालाय. नेमकी काय आणि कोणती भूमिका घ्यावी हे समजेनासे झालंय. राजसाहेबांचं ऐकायचं की शहराध्यक्ष यांचं?

मनसेची राजकीय विचारसरणी आणि लोकसभेसाठीची भूमिका ही शहराध्यक्ष शिंदे यांना समजलेलीच दिसत नाही. आपल्या नेहमीच्या भाजपपुरक भूमिका घेण्याचा मानसिकतेतुन हे पत्रक त्यांनी काढले असावे अशी टीका करून हे मनसेचे माजी पदाधिकारी म्हणाले, ‘मनसेच्या स्थापनेपासून आजतागायत प्रत्येकवेळी विचारपीठावर नेहमी छत्रपती शिवरायांबरोबरच प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा असतात. या सर्वांच्या पुरोगामी विचारांची बांधिलकी प्रारंभीच्या काळात मनसेनं स्वीकारली होती. मध्यंतरीच्या काळात वैचारिकदृष्ट्या दूर गेलेल्या राजसाहेब ठाकरे यांनी पुन्हा आपलं इंजिन रुळावर आणलंय आणि भाजपला विरोध केलाय! ही राजसाहेब ठाकरे यांची विचारसरणी आणि भूमिका पुण्याच्या मनसेच्या शहराध्यक्षांना समजलेलीच दिसत नाही. त्यांनी आपली निष्ठा मनसे, राजसाहेब ठाकरे यांच्याऐवजी भाजपेयींशी असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय! अद्यापि मतदारसंघातील उमेदवार ठरलेले नाहीत, कोण निवडणुकीच्या रिंगणात आहेत? कुणाशी लढत आहे, मोदी-शहा यांच्या विरोधात तुल्यबळ कोण आहे? हे स्पष्ट झालेलं नाही. अशावेळी मनसेच्या शहरप्रमुखांनी पत्रक काढून भूमिका सांगणं ही राजकीय अपरिपक्वताच म्हणायला हवी!

राजसाहेब ठाकरे हे येत्या ६ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मराठी नववर्षानिमित्त शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत कुणाचा प्रचार करायचा, कसा करायचा हे सांगणार आहेत. त्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तसे निमंत्रण ठाकरे यांनी पवारांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले आहे. त्यामुळं या मेळाव्याकडे मनसैनिकांबरोबरच राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे.