सराईत चोरट्यांकडून २९ मोबाईल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पाच सराईत चोरट्यांना अटक करून एक लाख ३२ हजार रुपये किमतीचे २९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

मयूर सुनील महाजन (१९, रा. त्रिवेणीनगर, तळवडे), अविनाश प्रकाश लोखंडे (२०, रा. विष्णू समुद्रे चाळ, विठ्ठलवाडी, देहूगाव), बाबा उर्फ शेंड्या राजेश मिसाळ (३१, रा. साई मंदिरामागे, वेणूनगर, वाकड. मूळ रा. समतानगर, परळीवेस, ता. अंबाजोगाई, ता. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच इतर दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस पथके गस्त घालत आहेत. दरम्यान पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना माहिती मिळाली की, देहूरोड शितळानगर मधील शितळादेवी मंदिराजवळ दोन इसम चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून मयूर महाजन आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले. तसेच विठ्ठलवाडी देहूगाव येथील पेट्रोलपंपाजवळून अविनाश लोखंडे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांनाही सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी विविध कंपन्यांचे २८ मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. हे मोबाईल फोन त्यांनी देहूरोड परिसरातून मागील वर्षभरात चोरले आहेत.

दुस-या एका कारवाईमध्ये पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना माहिती मिळाली की, एक मोबाईल चोर अंबाजोगाई येथे आहे. त्यानुसार त्याला त्याच्या मूळ गाव अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोटो कंपनीचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, संजय गवारे, प्रवीण दळे, फारूक मुल्ला, मयूर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदीप ठाकरे, राहुल खारगे यांच्या पथकाने केली.