‘फिरते व्हि- कलेक्ट’ उपक्रम ! गरजूंची दिवाळी गोड करणारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जुने कपडे, चपला, घरात वापराच्या वस्तुं कचर्‍यामध्ये टाकून देताय ! जरा थांबा. या वस्तु नक्कीच कोणाच्या तरी उपयोगात येतील. त्या वस्तु योग्य हातात पडतील आणि कचर्‍याचाही प्रश्‍न सुटेल यासाठी ‘स्वच्छ’ संस्था ‘फिरत्या व्हि -कलेक्ट’ योजनेच्या माध्यमातून आपल्या मदतीसाठी पुढे आली आहे.

आपल्या घरातील वर्षानुवर्षे वापरलेल्या परंतू त्यांचा कंटाळा आल्याने अनेकदा त्या कचर्‍यात टाकून दिल्या जातात. यापैकी अनेक वस्तूंचा वापर आणखी काहीकाळ निश्‍चितपणे होउ शकतो. त्याचवेळी असाही एक मोठा वर्ग आहे, ज्याची नवीन वस्तु खरेदीची क्रयशक्ती नसते, तो वर्ग निश्‍चितपणे या वस्तू वापरतो. परंतू वस्तु देणारा आणि तो घेणारा याचा मेळ होत नसल्याने मोठया प्रमाणावर या वस्तू कचर्‍यात टाकून दिल्या जातात. यामुळे कचर्‍याची समस्याही गंभीर होत चालली आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी शहरात कचरा संकलनाचे काम करणारी स्वच्छ संस्था पुढे आली आहे. दिवाळीपुर्वी अर्थात ९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान स्वच्छ संस्थेच्यावतीने या वस्तु गोळा करण्यासाठी आणि त्यांचे वितरण करण्यासाठी ‘फिरते व्हि कलेक्ट’ उपक्रम राबविणार आहे. प्रत्यक्षात संस्थेच्यावतीने ई वेस्ट व अन्य वस्तु गोळा करण्यासाठी १ नोव्हेंबरपासूनच व्हि कलेक्ट मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती व्हि कलेक्ट उपक्रमाच्या प्रमुख स्मिता राजबाली यांनी सांगितले.

राजबाली म्हणाल्या, की महापालिकेने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मान्यतेने गेली अनेक वर्षे कपडे, ई कचरा व अन्य वस्तू गोळा करत आहे. या वस्तु पुर्नवापरात आणण्यासाठी केंद्रही सुरू केली आहेत. परंतू या केंद्रांच्या ठिकाणी येणे सर्वांनाच शक्य होत नाही, त्यामुळे दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फिरते व्हि – कलेक्ट हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हडपसर येथील रहिवासी मृदु वर्मा म्हणाल्या की फिरत्या व्हि कलेक्टची सेवा घराजवळ उपलब्ध झाल्यास कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत सोयीचा राहाणार आहे. या उपक्रमाचे वेळापत्रक व अन्य माहितीसाठी मो .क्र. ७०६६०३२९७२ अथवा मो. क्र. ९७६५९९९५०० वर संपर्क साधावा, असे आवाहन स्वच्छ संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

You might also like