चिंताजनक ! मुंबईत एकाच वेळी 29 मतिमंद मुलांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. याचवेळी मुंबईतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबई 29 मतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. मतिमंद मुलांचे वसतीगृह असलेल्या चिल्ड्रन एड सोसायटी मानखुर्द येथील ही सर्व मुले असल्याची माहिती आहे.

मतिमंद मुलांपैकी 24 मुले आणि 5 मुलींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्व मुलांना विविध आजार असल्याने सर्वांना उपचारासाठी आणि संसर्ग वाढू नये यासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर यातील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वसतिगृहात बंदी असतानाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल तरी कसा, याचा आता संबंधित यंत्रणेकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाच्या स्थितीवरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मुंबईमध्ये सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यू दर वाढतो आहे. तसेच संसर्गाचे प्रमाण देखील चिंताजनक आहे. त्यामुळे तातडीने चाचण्यांच्या संख्येवरली मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.