मुंबईच्या विक्रोळीत शिवसेनेच्या उपविभागप्रमुखवर ‘गोळीबार’, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुलासमवेत घरातून बाहेर पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार विक्रोळी पूर्व येथे गुरुवारी सकाळी घडला.
शेखर जाधव हे या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. गोळी त्यांच्या खांद्याला लागली असून नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शेखर जाधव हे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमक्या येत होत्या. गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते मुलाला घेऊन घराबाहेर पडले. विक्रोळी पूर्व येथील साई मंदिर परिसरात आले असताना एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी जाधव यांच्या खांद्याला लागून ते जागेवरच कोसळले.

गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांचे लक्ष गेले. तेव्हा तेथून पळून जात असलेल्या एकाला पकडले आहे. त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. गोळीबाराबाबत नेमके कारण अद्याप समजले नाही. पोलीस हल्लेखोराकडे चौकशी करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/