पवार घराण्याच्या सुनबाई भाजपच्या गळाला ?

कळवण (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ऐनवेळी दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांची उमेदवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निश्चित झाली. यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. भारती पवार या उद्या (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीने ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी दिल्याने भारती पवार नाराज झाल्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून इच्छूक आहेत. विखे पाटील आणि मोहिते पाटील घराण्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राच्या पवार घराण्यातील सुनबाई भाजपच्या गळाला लागल्या आहेत.

भारती पवार या २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी पक्षात दाखल झालेले माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेने भाजपचे दार ठोठावले आहे. भाजपमध्ये जाण्याआगोदर त्यांनी दिंडोरी मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. पवार जो निर्णय घेतील तो मान्य राहील, कुठल्याही पक्षाची उमेदवारी केली, तरी डॉ. पवारांच्या पाठीशी उभे राहू, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.