‘काही लोकांना वाटतं मंदिर बांधून ‘कोरोना’ जाईल’, शरद पवारांची ‘राम मंदिर’च्या भुमीपूजनावर टीका

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येत राम मंदिर उभारणीस सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्यावरून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.


कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवे. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आम्हालाही वाटतं की कोरोना संपवला पाहिजे. पण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत. ते दिल्लीत जाऊन या मुद्यावर प्रश्न मांडतीलच, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दैऱ्यावर आले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राम मंदिराच्या भूमीपूजना बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.