राष्ट्रवादीच राहणार ‘पावर’फुल, सत्तावाटपाचा नवा ‘फॉर्म्युला’ समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे येतील. तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहणार असले तरीही खरी पॉवर राष्ट्रवादीकडेच राहील असं चित्र आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. गुरुवारी महायुतीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सत्तावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून, त्याबाबतचा निर्णय नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर म्हणजे 22 डिसेंबरनंतर पक्षश्रेष्ठी घेतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी दिले आहेत. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2004 मधेही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे देऊन उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली होती. थोडक्यात महाआघाडीचे सरकार स्थापण्यासाठी निर्णायक भूमिका बजावलेल्या राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद नसले तरी महत्वाची व सर्वाधिक खाती असतील अशी शक्यता आहे.

Visit : Policenama.com