कणकवली आणि माणमध्ये ‘लक्षवेधी’ लढत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुक होत आहेत. त्यात विविध मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. सर्वच पक्षात काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पण कणकवली आणि माण या दोन विधानसभा मतदारसंघात वैशिष्टयपूर्ण लढत रंगणार आहे. कारण राज्यभरात युती केलेल्या भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष येथे एकमेकांविरुद्ध लढत आहेत.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हापासून त्यांच्यात आणि शिवसेनेतून विस्तवही जात नाही. कणकवलीतून नारायण राणे यांचे पुत्र विद्यमान आमदार नितेश राणे हे भाजपाकडून निवडणुक लढवत आहेत. त्यांना विरोध करायचा हे शिवसेनेने पूर्वीपासून ठरविले होते. त्यासाठी त्यांनी राणे यांचे २५ वर्षे उजवे हात राहिलेले सतिश सावंत यांना शिवसेनेत प्रवेश दिला. आणि कणकवली येथून तिकीटही दिले आहे. या ठिकाणी कमळ आणि धनुष्य बाण अशी दोन्ही चिन्हे ईव्हीएम मशिनवर दिसणार आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. भाजपात प्रवेश केलेल्या विद्यमान आमदारांसाठी शिवसेनेने इतर ठिकाणच्या जागा सोडल्या. पण कणकवली सोडण्यास नकार दिला, तो खास नारायण राणे यांना विरोध यामुळेच. त्यामुळे शेवटच्या यादीत नितेश राणे यांचे नाव जाहीर करण्याची पाळी भाजपावर आली होती.

माण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपात प्रवेश केला. गोरे यांना भाजपाने तिकीटही दिले. त्याचवेळी शेखर गोरे हे पूर्वीपासून शिवसेनेकडून निवडणुकीची तयारी करत होते. युतीमध्ये माणची जागा पूर्वी शिवसेनेकडे होती. त्यामुळे शिवसेनेने या जागेवरील हक्क सोडला नाही. त्यांनी तिथून शेखर गोरे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे कमळ आणि धनुष्य बाण यांच्यात ही लढत रंगणार असली तरी त्याचबरोबर दोन भावांमधील ही लढाई वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारच दिलेला नाही. या दोघा भावांना अपक्ष प्रभाकर देशमुख हे लढत देत आहेत.

या दोन मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार सभेला गेले की काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण दोघांनाही या ठिकाणी महायुतीला विजयी करा असे म्हणण्या ऐवजी भाजपा किंवा शिवसेनेला विजयी करा असे म्हणावे लागणार आहे.

Visit : Policenama.com