कसब्यात रवींद्र धंगेकरांची ‘बंडखोरी’, पुन्हा करावा लागणार ‘संघर्ष’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. ते कसबा विकास आघाडी स्थापन करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सातत्याने संघर्ष करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

यापूर्वी दोन वेळा त्यांनी मनसेमधून कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी गिरीश बापट यांना जोरदार लढत दिली होती. त्यामुळे कसब्यातून आता बापट नसल्याने आपल्याला त्याचा फायदा होईल, अशी अटकळ बांधून धंगेकर यांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी केली होती. मात्र, काँग्रेसने निष्ठावंत अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली.

यापूर्वी दोन वर्षापूर्वी मनसेतून काँग्रेसमध्ये आलेल्या रवींद्र धंगेकर यांना महापालिका निवडणुकीत असाच पक्षातंर्गत गटबाजीचा फटका बसला होता. त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन भाजपाचे दिग्गज गणेश बीडकर यांचा मोठा पराभव करुन पुण्यात जायंट किलर ठरले होते. या पार्श्वभूमीवर आपल्याला काँग्रेस तिकीट देईल, अशी त्यांना अपेक्षा होती. आता तिकीट नाकारल्याने पुन्हा एकदा संघर्ष करीत त्यांनी कसबा विकास आघाडी स्थापन करुन लढण्याचा निर्धार केला आहे.

Visit : policenama.com