पुण्यात शिवसेनेत ‘खदखद’, काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – युतीचे निश्चित झाले…जागा वाटपही ठरले.. पडद्या आडून उमेदवारही जाहीर होतं आहेत…पण संपुर्ण शहरात आठ पैकी एकही जागा नाही. पूर्वी सत्तेत मोठ्या भावाची भूमिका आणि विधानसभेत किमान पुण्यात समसमान जागा वाटपात भाजप ने अशी भुमिका घेतल्याने शहर शिवसेनेत असावंअस्थतता वाढली आहे… विधानसभेत शहरातून पक्षाचे नेतृत्वच नसेल तर संघटना उभारी कशी घेणार ? या प्रश्नाने शिवसैनिक संतप्त झाले आहे…पुण्यात एकही जागा न मिळाल्यास वेगळी वाट धरायची तयारी करण्यासाठी शिवसैनिकांचे ‘संपर्क’ अभियान गतिमान झाले आहे.

मागील निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपने शहरातील आठही विधानसभा मतदार संघात विजय मिळवला. तर महापालिकेतही प्रथमच शंभरी गाठली आहे. यामुळे शहरात भाजपने दबदबा निर्माण केला आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. परंतु सत्ताकाळातील अडीच ते पाच वर्षात पुलाखालून बरेचसे पाणी गेले आहे. मागील अडीच वर्षाच्या काळात विरोधकांनी भाजपचे अनेक घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यामुळे भाजप काहीशी बॅकफूटवर आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर विधानसभेतही युती होणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्याचवेळी शिवसेनेने पुण्यातून विधानसभेच्या जागांसाठी मागणी सुरू केल्यानंतर भाजपकडून ताठरपणा दाखविण्यात येऊ लागला आहे. अशातच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 4 दिवसांवर आली असताना आठही मतदार संघातून भाजप च्याच उमेदवारांची नावे येऊ लागल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

शहरात भाजप उमेदवारांच्या प्रचार करत दारोदारी फिरायचे का ? असा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करत आहेत. यासाठी शिवसेने अंतर्गत संपर्क अभियान सुरू झाले आहे. पुण्यात एकही जागा मिळाली नाही तर निवडणुकीत रणनीती काय ठेवायची यावर गांभिर्याने मंथन सुरू झाले आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला याचा लाभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Visit : Policenama.com