पाण्याचे ‘राजकारण’ अंगलट आल्याने पालकमंत्र्यांना ‘उपरती’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील निवडणुकांसाठी धरणातील ‘पाणी’ वाटपाचे राजकारण करणाऱ्या भाजपला मतदारांनी दणका दिल्यानंतर पुणेकरांचा कळवळा आला आहे. मागील वर्षी ऑक्टोबरपासूनच पुण्यात दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणी कपात करून पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविणारेच आता ‘मसिहा’च्या स्टाईल मध्ये प्रशासनाला दमबाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकतेच पालकमंत्री आणि कोथरूडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून दम भरला आहे. धरणे भरली असताना दुरुस्तीच्या नावाखाली पाणी कपात केल्यास याद राखा, असे त्यांनी म्हंटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यंदा जुलै महिन्यातच शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरली आहेत. अद्याप पाऊस पडत आहे. यंदाच्या हंगामात 30 टीएमसी किंबहुना धरणे दोन वेळा भरतील एवढे पाणी नदीत सोडण्यात आले आहे. सप्टेंबर मध्ये नवरात्र सुरू होण्यापूर्वी पासून आजतागायत कुठल्याही कारणास्तव पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. निवडणुका आणि दिवाळी मुळेच प्रशासनाने पाणी बंद टाळलं आहे.

एकवर्षा पूर्वीही साधारण पावसाची स्थिती चांगली होती. पावसाळ्यात धरणे ओसंडून वाहिली. जवळपास 20 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले होते. परंतु यानंतरही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाटबंधारे विभागाचे पुण्याचे पाणी अचानक बंद केले. महापालिका कोटयापेक्षा अधिकचे पाणी उचलत असून एक पंप बंद करण्यात आला. मात्र दसरा, दिवाळीच्या तोंडावर ही कपात लावल्याने सर्वच स्तरातून उद्रेक झाला आणि प्रशासन आणि त्याआडून राज्यकर्त्यांना नमते घ्यावे लागले. मात्र दिवाळी संपताच पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा तेच कारण सांगत पुणेकरांना झटका देत पाणी पुरवठा बंद केला. बरेतर भाजपचे राजकीय संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडेच पाटबंधारे विभाग आहे.

परंतु यानंतरही पाटबंधारे विभाग नमला नाहीच. पुणेकर जास्तीचे पाणी वापरतात हा भाजपच्या काही ‘ स्थानिक ‘ नेत्यांचा पूर्वीपासून व्होरा असल्यानेच यावर मध्यम तोडगा काढण्यात आला. मागीलवर्षी डिसेंबर पासून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्यास वर्षभरात एक टीएमसी पाण्याची बचत होईल, हे गणित मांडून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. तसेच पर्वती ते लष्कर जलकेंद्रपर्यंतचा पाणी पुरवठा बंद पाईप लाईन मधून सुरू झाल्याने दररोज 100 एमएलडी पाण्याची गळती थांबली.

परंतु दुसरीकडे गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात येऊ लागल्याने त्याचा परिणाम शुक्रवार आणि शनिवारी होऊन बरेच ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाला. शहराच्या बऱ्याच भागातून पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सुरू झाल्या. विरोधक सातत्याने पाण्यासाठी आंदोलन करू लागले. विशेष असे की नुकतेच झालेल्या निवडणुकीच्या काळातही डेक्कन जिमखाना, आपटे रोड, मध्यवर्ती पुण्यासोबतच एनआयबीएम, वडगावशेरी, विमाननगर, कल्याणीनगर, शिवाजीनगर, बोपोडी परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. पाणी नाही तर मत नाही असे फलक झळकवत रोष व्यक्त केला.

याला कारणही तसेच आहे. गेल्या वर्षंभरात अपुऱ्या आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठयामुळे नागरिकांना टँकर ने पाणी घ्यावे लागले. अगदी यंदाच्या ऑगस्ट मध्ये भर पावसाळ्यात शहरात तबबल 20 हजार टॅंकरने पाणी पुरवठा झाला आहे. यापैकी सुमारे 17 हजार टँकर हे खासगी होते. मागील वर्षीच्या ऑगस्ट च्या तुलनेत हे प्रमाण पाच हजाराने अधिक आहे. विशेष असे की यावेळी चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे पालकमंत्री होते. केवळ निवडणुकांचे गणित मांडणाऱ्या पाटील अथवा पालिकेतील भाजपचे पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष का गेले नाही ? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अखेर उपरती झाली –

दुरुस्तीच्या नावाखाली गेली वर्षभर पुणेकरांना विकतचे पाणी घ्यायला लावणाऱ्या भाजपने राज्यातील पाच वर्षांच्या काळात पाटबंधारे विभागासोबत पाणी वाटपाचा करार केला नाही. केवळ शहरासोबत जिल्ह्यातील शिरूर, पुरंदर, दौंड आणि इंदापूर मधील राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी धरण साठ्याचा वापर केला गेला. परंतु नुकतेच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी पाण्यावरून केलेल्या राजकारणाला चांगलीच चपराक लगावल्याने सत्ताधाऱ्यांना उपरती झाल्याचे बोलले जात आहे.

2017 मध्ये दुष्काळ असताना पुणेकरांना मार्च ते जून दोन वेळा पाणी

2016 मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसा पाणी साठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यावर्षी नोव्हेंबरपासून शहरात पाणीकपात करून एकवेळ पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. वस्तुस्थिती जाणणाऱ्या पुणेकरांनी परिस्थितिशी जुळवून घेतले. परंतु जानेवारी नंतर पुन्हा दोन वेळ पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. नेमके फेब्रुवारीत – मार्चमध्ये होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शहरात दोन वेळ पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याचे उघड गुपित फार काळ लपून राहिले न्हवते.

Visit : Policenama.com