विखे कुटुंबीयांची व्हाँट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामी

खुनाचा आरोप : लोणी बुद्रुक येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. सुजय विखे यांची बदनामी व्हायला व्हावी, या हेतूने त्यांच्या वडिलांवर एका व्यक्तीच्या खुनाचा खोटा आरोप करणारा मजकूर ‘व्हाट्सअ‍ॅप’वर व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात शाहू आहेर पाटील (रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्यावतीने उमेदवारी दिलेली आहे. निळवंडे कृती समिती नावाच्या एका व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर पाटील यांनी विखे कुटुंबियांची बदनामी होईल, अशा आशयाचा मजकूर प्रसारित केल्याची तक्रार करण्यात आली होती. शैलेश बाळासाहेब विखे (रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता) या तक्रारीत म्हटले होते की, ‘विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केशव कुलकर्णी यांचा खून करून सत्तेचा गैरवापर करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. या बदनामीकारक मजकुरामुळे विखे यांची बदनामी झाली आहे.’

सदर तक्रारीची चौकशी करून कर्जत पोलीस ठाण्यात शैलेश विखे यांच्या फिर्यादीवरून शाहू आहेर पाटील यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 371 (जी), 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे करीत आहेत.