‘आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही, आज आमची सत्ता आहे कधी तरी… ‘: खा. सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi) सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षाच्या कालावधीत सरकारवर विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात टीका केली असून, वारंवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सरकार अजूनही शाबूत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेले अरुण लाड ( Arun Lad) यांच्या प्रचारार्थ त्या इंदापूर येथे आल्या होत्या. त्यावेळी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर टीका केली.

टीका करताना सुळे म्हणाल्या, आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आमची आहे कधी तरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही; परंतु काही लोक सारखे सारखे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असे बोलत असतात. त्यांच्या बोलण्याची मला फार गंमत वाटते. पण नेहमी रिकामी भांडीच जास्त आवाज करतात. मात्र, भरलेली भांडी अजिबात आवाज करत नाहीत. असे म्हणत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तुम्हाला पाहिजे तितका आवाज करा. आणि समजा आमचे महाविकास आघाडी सरकार पडले, तर पुढे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. पण तूर्तास तरी आमचे सरकार स्थिर असून, ते आपला कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल, असा ठाम विश्वासदेखील सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळे म्हणतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत असून, कोरोनावरील (Corona) लस निर्माण करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेली कोरोनावरील लस पुण्यात निर्माण होत आहे. यापेक्षा राज्य सरकारचे मोठे दुसरे ते यश काय आहे, असे गौरवोद्गार काढतानाच सुळे यांनी मोदींनाही आता पुणे हवंहवंस वाटू लागले आहे, अशी मिश्किल टिप्पणीदेखील यावेळी केली. त्यामुळे महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच मोदी महाराष्ट्रात येत असून, काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.