अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नव्हे तर ‘हा’ आहे देशातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, तब्बल 2.5 कोटींचं बक्षीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पेक्षाही माओावादी नेता गणपती याच्या नावावर जास्त रकमेचा इनाम आहे. गणपतीला अटक करणाऱ्या किंवा त्याची ठोस माहिती देणाऱ्याला तब्बल अडीच कोटींपेक्षा जास्त रुपयांचा इनाम घोषित करण्यात आला आहे. माओवादी चळवळीचा म्होरक्या असलेला गणपती आता शरण येण्याच्या मानसिकतेत असून पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता गणपतीच्या कारनाम्यांची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे.

गणपती उर्फ मुप्पला लक्ष्मण राव यानं माओवादी चळवळीचं नेतृत्व केलं आहे. देशभर त्याचा विस्तारही केला आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार या राज्यांनाही गणपती हवा आहे. गेली काही दशकं यानं देशातल्या अनेक राज्यात मोठ्या हिंसक कारवाया घडवून आणल्या आहेत. अशी माहिती आहे की, सध्या तो गंभीर आजारानं ग्रस्त आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यानं चळवळीचं नेतृत्व दुसऱ्याकडं सोपवलं आहे. गेल्या 13 वर्षांपासून तो चळवळीच्या प्रमुख पदावर होता. त्यानं आता पदत्याग केला आहे. नंबाला केशव राव उर्फ बसवराजु याची नवा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वाढतं वय आणि प्रकृतीमुळं त्यानं पदत्याग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गणपती 71 वर्षांचा आहे. त्याला पदमुक्त करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नंबाला उर्फ बसवराजु हा गेल्या 35 वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे. त्याला बॉम्ब आणि स्फोटकतज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं. माओवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी कमिटीचा प्रमुख म्हणून बसवराजुकडे अनेक वर्ष जबाबदारी होती. अनेक हिंसक माओवादी कारवायांची योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीमागे बसवराजूची मुख्य भूमिका आहे. जर गणपती शरण आला तर माओवादी चळवळीला मोठा हादरा बसेल. तेलंगणा सरकार आणि गणपती यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू असून त्यात सकारात्मक चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.