८ वर्षांपुर्वी खुन करून पसार झालेला आरोपी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ८ वर्षांपुर्वी कात्रज येथील सुखसागरनगर परिसरात खून करून पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने अटक केली आहे. गाडी पडल्यानंतर का हसला अशी विचारणा केल्यावरून एकाचा खून करण्यात आला होता. त्यापैकी १० जणांना यापुर्वी अटक करण्यात आली होती.

अभीत प्रमोद हेंद्रे (वय १९, रा. सुखसागर नगर) याचा खून करण्यात आला होता. तर प्रथमेश श्रृंगारपुरे हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. ९ जूलै २०११ रोजी हा खून करण्यात आला होता. तर पोलिसांनी याप्रकरणी फरार असलेल्या कृष्णात लक्ष्मण राशीनकर (वय ३५, रा. वेताळबाबा चौक) याला अटक करण्यात आली आहे.

का हसला विचारल्याने केला खून
डाकै चौक येथील दुगड इमारतीसमोरून प्रथमेश श्रृंगारपुरे आणि त्याचा मित्र यश निंबाळकर हे स्कूटीवरून जात असताना ते घसरून पडले. त्यावेळी ते स्कूटी सुरु करत असताना सुरु झाली नाही. त्यामुळे तेथे उभे असलेले विकी साळुंखे व इक्बाल शेख हे हसल्याने त्यांना का हसले म्हणून त्याने श्रृंगारपुरे याने विचारले तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर ते निधून गेल्यावर या बाचाबाचीचा राग मनात धरून १० ते ११ जणांनी गप्पा मारत उभ्या असलेल्या श्रृंगारपुरे आणि अभिजीत हेंद्रे यांच्यावर हल्ला केला. यात कोयता लाकडी दांडके आणि लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यात आली. त्यात हेंद्रे याचा मृत्यू झाला तर श्रृंगारपुरे गंभीर जखमी झाला होता.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकऱणी १० जणांना अटक केली होती. तर राशीनकर हा पसार झाला होता.

ओळख लपवून राहात होता पुण्यात
राशीनकर हा पुण्यातच आपले नाव आणि पत्ता बदलून राहात होता. फरार झाल्यानंतर तो नाव पत्ता बदलून ओळख पटू नये म्हणून ठिकाणं बदलत होता. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान तो रिक्षा चालवत होता. दरम्यान पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर यांना बातमी मिळाली की, अभिजीत हेंद्रे याच्या खून प्रकरणातील फरार आरोपी रिक्षा चालवत असून तो शिवाजीनगर एस टी स्टॅंड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला सापळा रचून अटक केली.

यासोबतच पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरून आंबेगाव पठार येथे विनायक पवार याचा खून केल्याप्रकऱणी एका संशयित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, तसेच कर्मचारी संतोष क्षीरसागर, दीपक मते, विल्सन डिसूजा, अतुल साठे, संदिप राठोड, शकील शेख, दत्तात्रय गरुड, संदिप तळेकर, गजानन गणबोटे, सुजीत पवार यांच्या पथकाने केली.