वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाघ, बिबट्या आणि मगर यांच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्यास ठाणे शहर खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन हस्तीदासह ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. समीर शांताराम जाधव (वय-३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी ही कारवाई आज केली.

खंडणी विरोधी पथकाने जप्त केलेल्या वन्यजीव प्राण्यांच्या कातडीत वाघाची कातडी असून हे वाघ विदर्भातील असल्याने त्याचा विदर्भाशी कनेक्शन असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज जप्त केलेल्या कातड्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ दोन कोटी रुपेय किंमत असण्याचीही शक्यता असल्याचे ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठाण्यातील बाळकुम-मजिवाडा येथे वन्यजीव प्राण्याचे कातडे व हस्तीदंताची विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वन्य अधिकाऱ्यांसह सापळा रचला. त्यावेळी समीर याच्या संशयास्पद हालचालीवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून हस्तीदंत, वाघाची कातडी आणि भुसा भरलेली मगर आढळून आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर, हेमंत ढोले, रोशन देवरे, विलास कुटे, सहायक पोलीस निरीक्षक भिवणकर यांच्या पथकाने केली.