कांदा पुन्हा तेजीकडे ,घाऊक बाजारात सरासरी 41 रुपये किलोचा भाव

लासलगाव :  वार्ताहर –   केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातल्यानंतर काही काळ दराबाबत स्थिर असलेल्या कांद्याने घाऊक बाजारात पुन्हा उसळी घेतली असून शनिवारच्या तुलनेत कांदा दरात ५५० रुपयांची सरासरी वाढ होत आज येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी ४१०० रुपये प्रति क्विंटल तर कमाल ४५५२ रुपये भाव मिळाला.

राज्यातील बहुतांश कांदा पावसामुळे सडून गेला आहे. यामुळे सध्या शिल्लक असलेल्या कांद्यावर वर्षांचे गणित अवलंबून असताना कांदा उत्पादकांचे गणित निर्यात बंदीमुळे विस्कटलेले गेले असल्याचे चित्र दिसत आहे

अतिवृष्टीमुळे राज्यासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेशातील नवीन लाल कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने चाळीत साठविलेल्या शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याची मागणी देशांतर्गत वाढली आहे. सध्या बाजार समितीत येणारा उन्हाळ कांदा मार्च – एप्रिल महिन्यात चाळीत साठवलेला आहे.बदलत्या वातावरणामुळे या कांद्याच्या वजनात आणि प्रतवारीत घट झाली आहे.त्यामुळे वाढत्या भावातून कुठेतरी खर्च निघत आहे.

महिनाभरापूर्वी महाराष्ट्र तसेच कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा हंगाम तर लांबणीवर पडला आहे. मुसळधार पावसामुळे शेतात नवीन कांद्याची रोपे वाहून गेली होती. त्यामुळे साठवणूक करण्यात आलेल्या जुन्या कांद्याच्या मागणीत वाढ झाली आणि घाऊक, किरकोळ बाजारात जुन्या कांद्याच्या दरात वाढ होतांना दिसत आहे. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात लावलेली कांद्याची रोपेदेखील यंदा तग धरु शकलेली नाहीत. कमी उत्पादन आणि जास्त मागणी यामुळे कांदा दरात चढ-उतार होत आहेत.

येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर उन्हाळ कांद्याची ५६९ वाहनांतून ६२०० क्विंटल आवक होऊन कांद्याला किमान १००० सरासरी ४१०० तर कमाल ४५५२ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.

कांदा सरासरी भाव (प्रति क्विंटल)

१ ऑक्टोबर – ३१००
३ ऑक्टोबर – २६०१
५ ऑक्टोबर – २९००
६ ऑक्टोबर – ३०००
८ ऑक्टोबर – ३३००
९ ऑक्टोबर – ३३५१
१० ऑक्टोबर – ३५५१
१ २ऑक्टोबर – ४१००