खुशखबर ! महिन्याभरा पेक्षाही कमी दिवसात पेट्रोल-डिझेल झालं 3 रूपयांनी ‘स्वस्त’, ‘या’ कारणामुळं आणखी कमी होणार दर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याने नव्या वर्षात पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या महागाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 10 जानेवारीनंतर आतापर्यंत पेट्रोल-डीझेल 3 रुपये प्रती लीटरपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. कमोडिटी एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, चीनमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने जगभरातील व्यापारावर परिणाम झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत घसरण झाली आहे. याचा परिणाम किमतीवर झाला आहे. येत्या काही दिवसात कच्चे तेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारात पेट्रोल, डीझेलच्या किमती 2 रूपयांनी घटू शकतात.

पेट्रोलचे नवे दर आयओसीच्या वेबसाइटवर दिल्याप्रमाणे, मंगळवारी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर न बदलता सोमवारच्या दरावर 73.04 रुपयांवर स्थिर आहे. तर मुंबईत 78.69 रुपये प्रती लीटर आहे. याशिवाय कोलकातामध्ये 75.71 रुपये प्रती लीटर आणि चेन्नईमध्ये 75.89 रुपये प्रती लीटर आहे.

डीझेलच्या दरात पेट्रोलप्रमाणेच मंगळवारी कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत एक लीटर डीझेलचे दर कोणताही बदल न होता सोमवारचा दर 66.09 रुपयांवर स्थिर आहे. तर मुंबईत 69.27 रुपये प्रती लीटर आहे. याशिवाय कोलकातामध्ये 68.46 रुपये प्रती लीटर आणि चेन्नईमध्ये 69.81 रुपये प्रती लीटर आहे.

पेट्रोल-डीझेल स्वस्त होण्याचे आहे हे कारण –
एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, चीनमध्ये जीवघेणा कोराना व्हायरस पसरल्याने मृतांची संख्या 425 झाली आहे. सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे. क्रुडमध्ये चीन जगात दुसरा मोठा ग्राहक आहे. चीन आपल्या आवश्यकतेपैकी 80 टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. चीनमध्ये व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर त्याचा परिणाम तेथील उद्योग आणि लोकांवर झाला आहे. यामुळे मागणी कमी झाली आहे. याचा परिणाम अंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या मागणीवर झाला असून या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.

एका महिन्यात कच्चा तेलाच्या दरात 27 टक्के घसरण झाली आहे. ब्रेंट क्रुडचे दर 74 डॉलर प्रती बॅरलवरून घसरून 54 डॉलर प्रती बॅरलवर आले आहेत. पुढील 15 दिवसात पेट्रोल-डीझेलच्या दरात आणखी घसरण होऊ शकते.