सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील एकाला अटक ; दोन गुन्हे उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – ‘वॉच’ ठेवून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एकाला पिंपरी-चिंचवड विशेष तपास पथकाने (एसआयटी) अहमदाबाद येथून अटक केली. त्याच्याकडून पिंपरी येथून पंजाबच्या सराफाला लुटून नेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. तर कारची काच फोडून तीन लाख चोरल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. रोहित ऊर्फ कालू दलपत घमंडे (30, रा. छारानगर, कुबेरनगर, अहमदाबाद, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे व्यापारी रवी अमीचंद मेहता (71, रा. अजनाला, जि. अमृतसर, पंजाब) हे सोन्याच्या मोरण्यांची विक्री पंजाब, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात करतात. या राज्यांमध्ये जाऊन ते सोन्याच्या व्यापा-यांना भेटून त्यांच्या मोरण्या विकतात. 25 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ते पिंपरी चौकातून जात असताना पाच जणांनी मिळून त्यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. त्यामध्ये मेहता जखमी झाले. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी पोलिसांसोबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी घटनास्थळावरील व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावरून एका संशयितांचा माग काढत पोलीस येरवड्यात पोहोचले. तिथून सीसीटीव्हीमध्ये दिसणा-या आरोपींचे फोटो निष्पन्न केला. पोलिसांच्या राष्ट्रीय पातळीवरील व्हाट्सएप ग्रुपवरुन आरोपी निष्पन्न केला.

संशयित आरोपी गुजरातमधील अहमदाबाद शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, अहमदाबाद येथील सूत्रांकडून पिंपरी-चिंचवडमधील पोलिसांनी आरोपींबाबत माहिती मिळवली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी महादेव जावळे, सोमनाथ बोराडे, नितीन खेसे, विशाल भोईर, कबीर पिंजारी, पंकज भदाने यांचे पथक अहमदाबादला रवाना झाले.

22 जानेवारी ते 27 जानेवारी 2020 या कालावधीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे विशेष तपास पथकाने मुक्काम ठोकून पुन्हा आरोपीचा माग काढून संशयित आरोपी रोहित याच्या घरावर छापा मारून त्याला ताब्यात घेतले. मेहता यांची बॅग हिसकावताना आरोपी रोहित दुचाकीवर मागे बसला असून त्याचा साथीदार दुचाकी चालवत असल्याची त्याने कबुली दिली. त्यावरून त्याला अटक करून त्याच्याकडून 210 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मोरण्या पोलिसांनी जप्त केल्या.

आरोपींनी 24 डिसेंबर रोजी डेक्कन होंडाच्या समोर पिंपरी येथे एका कारच्या काचा फोडून त्यातून तीन लाख रुपयांची बॅग चोरून नेली होती. त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात समीर थापर (रा. मोशी) यांनी फिर्याद दिली. समीर यांनी त्यांच्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी मित्राकडून उसने पैसे घेतले होते. ते चोरट्यांनी चोरून नेले. तसेच कारच्या काचा फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. हा गुन्हा देखील या कारवाईमुळे उकडकीस आला आहे. आरोपी रोहित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर त्याच्या वेगवेगळ्या साथीदारांसोबत राजस्थान, गुजरात, हैद्राबाद, औरंगाबाद येथे पाच गुन्हे दाखल आहेत. तो राजस्थान येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार आरोपी आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, राम गोमारे, उपनिरीक्षक विजय जगदाळे, सहाय्यक फौजदार सुभाष सावंत, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, संतोष असवले, सोमनाथ बो-हाडे, कबीर पिंजारी, विशाल भोईर, महादेव जावळे, नितीन खेसे, पंजाक भदाने, प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like