पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुंतवणूक, बचत किती ? संपत्ती किती ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतातील बहुसंख्य नागरिक शेअर बाजार, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा आपली बचत बँकेतच ठेवतात. बँकेतील ठेवीच सुरक्षित असल्याची भावना कोट्यवधी भारतीय नागरिकांमध्ये आहे.

तद्वतच कोट्यवधी भारतीय नागरिकांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपली बचत बँकांमध्ये मुदत ठेवींच्या रुपात ठेवली आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार ३० जूनपर्यंत मोदी यांच्याकडे असलेल्या संपत्तीचं एकूण मूल्य १ कोटी ७५ लाख ६३ हजार ६१८ रुपये इतके आहे.

मागील वर्षींच्या तुलनेत मोदींकडे असलेली जंगम मालमत्ता २६.२६. टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्याकडे ३० जूनपर्यंत ३१ हजार ४५० रुपयांची रोकड होती. वेतनात झालेली बचत आणि मुदत ठेवींवरील व्याजामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत मोदींच खात आहे. त्या बचत खात्यात ३० जूनला ३.३८ लाख इतकी रक्कम होती. कर सवलत देणाऱ्या काही योजनांमध्ये मोदींनी गुंतवणूक केली आहे.

मोदींनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात ८ लाख ४३ हजार १२४ रुपयांची गुंतवणूक केली आहे. मोदींचं विम्याचा प्रीमियर १ लाख ५० हजार ९५७ रुपये इतका आहे. जानेवारी २०१२ मध्ये मोदींनी २० हजार रुपयांचे इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड खरेदी केले. ते अजूनही मॅच्युर झालेले नाही. मोदींच्या स्थावर मालमत्तेत फारसा बदल झालेला नाही.

मोदींच्या नावावर गांधीनगरमध्ये एक घर आहे. त्याची किंमत १.१ कोटी रुपये इतकी आहे. गांधीनगरमधील घराची मालकी मोदी आणि त्याच्या कुटूंबीयांकडे आहे. मोदींवर कोणतेही कर्ज नसून, त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं वाहन नाही. तसेच मोदींकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत.