‘पैशांचा’ पाऊस पाडणारी ‘चौकडी’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तांत्रिक विद्येद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अनेक व्यावसायिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौकडीच्या गुन्हे शाखा कक्ष 9 च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. आरोपीने त्याच्या रहात्या घरातील खोलीत पैशाने भरलेली असल्याचा अभास निर्माण केला होता. त्यासाठी त्याने थर्माकॉलला पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या खोट्या नोटा चिटकवल्याचे तपासात समोर आले. याद्वारेच ते व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करत होता. यामध्ये फसवणूक झालेल्या व्यावसायिकाला या चौकडीने 1 कोटी 12 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक केली.

वांद्रे येथील लालमट्टी झोपडपट्टीजवळ एका कारमध्ये बसून काही जण पैशांचा पाऊस पाडण्याची चर्चा करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारमधील चौकडीला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी निश्चितकुमार रविराज शेट्टी (वय-36) हा मागील अनेक वर्षापासून अशा प्रकारे फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली. त्याने अनेक व्यावसायिकांकडून बँक खात्यात आणि रोख स्वरुपात कोट्यावधी रुपये घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

निश्चीतकुमार शेट्टी आणि त्याच्या साथिदारांनी लोकांना काळी जादू दाखवून आत्मा बोलावून तांत्रिक विद्येच्या जोरावर पैशांचा पाऊस पाडत असल्याचे सांगत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक व्यावसायिकांनी त्यांना पैसे दिले होते. मात्र, त्यांनी पैसे घेतल्यानंतर ठिकाणे आणि मोबाईल बंद करून नव्या सावजाच्या शोध घेत होते. ही चौकडी त्यांच्याकडे असलेल्या रक्कमेच्या 50 पट रक्कम देण्याचे आमिष संबंधिताला दाखवत होते.

आरोपींकडून ‘भारतीय बच्चों का बँक’ असे लिहलेल्या नोटा, अ‍ॅबसी ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या नावाचे बनावट पत्र, काळ्या कापडाची बाहुली, नारळ, रंगीत धाग्याची गुंडी, हळद, कुंकु, लिंबू, काळे तीळ, सुया आणि काळे कापड जप्त केले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस निरीक्षक संजय गावडे, आशा कोरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, शरद धराडे, वाल्मीक कोरे, पोलीस उपनिरीक्षक विजयेंद्र आंबवडे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/