३ हजार रुपयाची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दारूबंदीच्या दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३ हजार रुपयाची लाच स्विकारताना सोनई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) करण्यात आली. विजय जॉन भिंगारदिवे (वय-५२) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी नेवासा तालुक्यातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

विजय भिंगारदिवे हे सोनई पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्य़रत आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी विजय भिंगारदिवे याने ४ हजार रुपयाची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी आज पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी भिंगारदिवे याने तक्रारदार यांच्याकडे ४ हजार रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. अधिकाऱ्यांनी सापळा रचून विजय भिंगारदिवे याला तीन हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.