पुण्यात टँकरच्या धडकेत 1 वर्षाच्या चिमुकलीसह 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू, टँकर चालक पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव टँकरने मोपेड दुचाकीला दिलेल्या धडकेत 1 वर्षाच्या चिमुकलीसह 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरेगाव पार्क येथील आय.बी. बंगला चौकात ही घटना रविवारी रात्री घडली आहे. यात मोपेड चालक तरुण जखमी झाला आहे.

उंमेहनी सुहेल शेख (वय 1, कॅम्प) व रहेनाज रिझवान शेख (वय 16, विमाननगर) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी भाऊ रूकसार रिझवान शेख (वय 24) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रूकसार हा या अपघातात जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा रविवारी रात्री लहान बहिण रहेनाज आणि मामाची मुलगी उमेहनी हिच्यासोबत मोपेडवरून रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना घेऊन कॅम्प परिसरात मामाकडे येत होता. त्यावेळी ते येथील रेसिडेन्सी क्लब समोरील आय बंगला चौकातून आल्यानंतर पाठीमागून भरधाव आलेल्या टँकरने उजव्या बाजूने जात असताना जोरात धडक दिली. यात तिघेही गाडीवरून खाली कोसळले. यात दोघी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रूकसार हा जखमी झाला आहे. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.