पुण्यात वाहतूक पोलीसालाच झाला 5 हजाराचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून वाहतूक पोलीस दंड आकारतात. मात्र, पुण्यात एका वाहतूक पोलीसालाच दंड करण्याची वेळ वाहतूक विभागावर आली आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओमध्ये जाऊन दंड भरावा लागेल, अशी भीती दाखवत वाहन चालकाकडून 2500 रुपये उकळणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बाबुराव दौंडकर असे दंड झालेल्या पोलिसाचे नाव आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांनी दौंडकर यांना ही शिक्षा सुनावली. दौंडकर हे विमानतळ वाहतूक विभागात वाहानांवर कारवाई करणाऱ्या टेम्पोवर ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते. 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी एकाचे वाहन पकडले होते. वाहनचालक गाडी सोडवण्यासाठी दौंडकर यांच्याकडे गेला. तेव्हा त्यांनी वाहन जप्त करण्याची आणि आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल, अशी भीती गाडी मालकाला दाखवली.

त्यानंतर टेम्पोचालक संजय बनसोडे आणि हेल्पर धर्मा यांच्याकडे निर्देश करून त्यांच्यामार्फत पैशाची मागणी केली. त्यावळी गाडी मालकाकडून 2500 रुपये घेतले. याबाबत दाखल तक्रारीची उपायुक्त यांनी चौकशी केली. त्यात दौडकर यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले. पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्या प्रकरणी दौंडकर यांना पाच हजार रुपये दांडाची शिक्षा सुनावण्यात आली.