Pune : गुळुंचे येथील प्रसिद्ध काटेबारस यात्रा ‘कोरोना’मुळे रद्द

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन  –   राज्यभर प्रसिद्ध असलेली पुरंदर तालुक्यातील गुळुंचे व कर्नलवाडी येथील काटेबारस यात्रा यंदा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्याचा
निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे. याबाबत समितीने नुकतेच प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून सोमवार (दि.१६) ते शुक्रवार (दि.२७) या कालावधीत पार पडणाऱ्या यात्रेचे धार्मिक कार्यक्रम मोजक्या मानक-यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

गुळूंचे ( ता.पुरंदर) येथील देवस्थानाला शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असून काटेबारस यात्रा दरवर्षी १२ दिवस सुरु असते. मुख्य यात्रा कार्तिक शुद्ध द्वादशी दिवशी काटेबारस यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातून तसेच परराज्यातून हजारो भक्तगण हजेरी लावतात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा करण्यावर शासनाने निर्बंध घातल्याने यात्रा होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, येथील भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने काटेबारस यात्रेच्या बाबत भाविकात कमालीचे औत्सुक्य पाहायला मिळत होते. परंतु , यात्रा समितीने शासनाचे निर्बंध पाळून मोजक्या मानकरी, खांदेकरी यांच्यात यात्रा करण्याचा निर्णय घेतला असून देवाचे धार्मिक विधी, स्नान, घटस्थापना, पूजा, आरती यांसाठी पुजारी, मानकरी व यात्रा कमिटी यांच्याव्यतिरिक्त इतरांना मज्जाव करण्यात आला आहे.

याबाबत, पुरंदरचे निवासी नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे यांनी यात्रेसाठी सहा अटी कमिटीला बंधनकारक केल्या असून पुजारी, मानकरी व यात्रा कमिटी यांच्याव्यतिरिक्त इतरांनी उपस्थित राहू नये, मास्क व सॅनीटायझरचा वापर करावा, परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, नित्य पूजा करणाऱ्यांनी एकमेकांपासून सुरक्षित ६ फुटांचे किमान शारीरिक अंतर ठेवण्यात यावे अशा अटी प्रशासनाच्या वतीने घालण्यात आल्या असून जेजुरी पोलीस स्टेशनला कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत कळविण्यात आले आहे.