पुण्यातील मारुंजी परिसरातील दुकानांना भीषण आग; 2 दुकाने जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मारुंजी गावात मध्यरात्री दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 2 दुकाने जळून खाक झाली असून, यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पीएमआरडीए अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.

मारुंजी गावात ग्रामपंचायतजवळ फ्लेवर्स चायनीज शॉप व आदेश्वर शीट कव्हर दुकाने आहेत. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अचानक शीट कव्हरच्या दुकानातून धूर येत असल्याचे आढळून आले. नागरिकांनी अग्निशमन दलाला व पोलिसांना माहिती दिली. तत्काळ पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवनांनी येथे धाव घेतली. तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. तसेच शेजारच्या चायनीज शॉपला विळखा घातला होता. जवानांनी पाण्याचा माराकरून अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पीएमआरडीएचे अधिकारी विजय महाजन व संदीप शेळके, हितेश आहेर, राहुल शिरोळे , संदीप तांबे, प्रकाश मदने, सुरज इंगवले, काळे, मायनाळे, कोरडे, गायकवाड, गोसावी यांनी ही कामगिरी केली.