पुण्यात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू; एक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली आहे. गणेशखिंड रस्ता, वानवडी, शेवाळवाडी आणि खराडी परिसरात झाले आहेत. गणेशखिंड रस्त्यावरुन भरधाव दुचाकीस्वार घसरुन खाली कोसळला. यात चालक तरुणाचा मृत्यू झाला. राहूल सतीश सावंत (वय २४, रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार एस. टी. निकम यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात २२ जूनला रात्री सव्वा नउच्या सुमारास घडला होता.

दुसरी घटना वानवडीत घडली आहे. क्रेनने दिलेल्या धडकेत तीन वर्षीय चिमुरद्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत त्याची आई जखमी झाली आहे. सुभाष भारत खाडे (वय ३, रा. काकडे मैदान, वानवडी ) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. अपघातात रेखा भारत खाडे जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी चालक अर्जुन रामदुलारी विश्वकर्मा (वय २०, रा. उंड्री, कोंढवा, मूळ-लखनउ ) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वानवडीतील संविधान चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.

भाजी खरेदी करुन पायी घरी जात असताना अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २८ जूनला रात्री नउ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी भाजीमार्केट समोरील रस्त्यावर घडली. दादा तुकाराम जगताप (वय ३८, रा. शेवाळवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पोपट माने यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच चौथ्या घटनेत तिमन्ना बाबू कर्णिक (वय २६, रा. थिटे वस्ती, खराडी ) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २५ जूनला रात्री दहाच्या सुमारास खराडीतील प्राईड आयकॉन इमारतीजवळील रस्त्यावर हा अपघात घडला आहे.