पुण्यातील शिवाजीनगरमध्ये ‘पाणी नाही, तर मत नाही’, रोख भाजपच्या दिशेने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने त्यांच्याच पक्षाच्या महापौरांच्या बंगल्यावर पाण्यासाठी मोर्चा नेऊनही आठ – दहा महिन्यात पाण्याचा प्रश्न सुटला नाही. विशेष असे की त्याच खासदारांचे सुपुत्र या भागात नगरसेवक असून आता उमेदवारही आहेत हे विशेष …ही परिस्थिती अन्य कुठली नसून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगर भागातील आपटे रस्त्यावरील…
येथील नागरिकांना विशेषतः महिलांना अक्षरशः रस्त्यावर उतरून ‘पाणी नाही तर मत नाही’ असे बॅनर घेऊन निषेध नोंदवावा लागला ही स्मार्ट सिटीतील शोकांतिका आहे.

गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून विस्कळित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याला वैतागून डेक्कन जिमखाना परिसरातील आपटे रस्त्यावरील सोसायट्यांनी ‘पाणी नाही, तर मत नाही’ असा पवित्रा घेतला आहे. ‘आपला पाणी प्रश्न सुटत नाही, मग आपण मतदान का करायचे’ अशा आशयाचे फलक सोसायट्यांनी लावले असून, जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत मत मागायला येऊ नका या शब्दांत नागरिकांनी सर्वपक्षीय उमेदवारांना इशारा दिला असला तरी त्यांचा रोख भाजपच्या दिशेने आहे.

नुकतेच शिवाजीनगर मतदार संघातील बोपोडी परिसरातील महिलांनी महापालिका भवन येथे हंडा मोर्चा काढून पाणी मिळत नसल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. विशेष असे की पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी हा मोर्चा आणला होता. तर कोथरूड मध्येही पाण्याच्या समस्येवरून नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांनी रेव्हेन्यू कॉलनी तील पाण्याच्या समस्येवरून महापौर मुक्ता टिळक यांच्या बंगल्यावर मोर्चा नेला होता. त्यावेळी धरणात असलेला पाणी साठा कमी असल्याचे तसेच तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा बाधित झाल्याचे कारण नागरिकांना सांगण्यात आले होते. तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येतील असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर मोर्चेकरी परतले होते. परंतु ७- ८ महिन्यानंतर ही डेक्कन जिमखाना या भाजपच्या बालेकिल्ल्यात अद्याप पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही, हेच आपटे रोड परिसरातील नागरिकांच्या नुकतेच झालेल्या आंदोलनावरून दिसून येत आहे.

‘आतापर्यंत टँकरपोटी जवळपास लाख-दीड लाख रुपये खर्च केले असून, पाण्यासाठी सर्वसामान्यांच्या तोंडाला फेस आला आहे’,. मुसळधार पावसामुळे धरणे काठोकाठ भरली असून निम्मे पुणे पाण्यात आहे. समोर।रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत आहेत पण घरात पाणी नाही, अशी व्यथा आपटे रस्त्यावरील नागरिक व्यक्त करत आहेत. . नाईलाजास्तव सोसायटीधारकांना दिवसाआड टँकर मागवावे लागत आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. त्यावर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी, कामगारांनी पाण्याचा दाब तपासून कमी असल्याची कबुलीही दिली. मात्र, समस्या सोडविण्यासाठी काहीच केले नाही, असा दावा परिसरातील रहिवाशांनी केला आहे. स्थानिक राजकारणी आणि टँकरचालकांचे लागेबांधे असल्याची शंका येते,’ असा आरोपही या रहिवाशांनी पत्राद्वारे केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा….

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा आपटे रस्ता परिसरात आले होते, त्या दिवशी नळाला धो-धो पाणी होते. तो दिवस वगळता गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून करंगळी एवढेही पाणी येत नाही. स्थथानिक नगरसेवकाांना याबाबत तक्रार देऊनही काहीच उपयोग झाला नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

Visit : Policenama.com